… म्हणून कुलदीप आणि चहल टी- 20 संघात नाही – विराट कोहली

2072

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका संघात रविवारपासून तीन टी- 20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या सामन्यांसाठी कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांना संघात स्थान मिळालेले नाही. याबाबत हिंदुस्थानी संघाचा कर्णधार विराट कोहली याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट संघ अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. संघाचे आगामी सामने आणि पुढील वर्षी टी-20 विश्वचषक सामन्यांसाठी संघाकडे पुरेसे कॉम्बिनेशन उपलब्ध असावे, यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत, असे कोहलीने स्पष्ट केले.

टी-20 सामन्यात युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव संघाबाहेर असल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. याआधी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांना संघाबाहेर ठेवत कुलदीप आणि चहलला संघात स्थान देण्यात आले होते, त्यावेळीही असेच प्रश्न विचारण्यात आल्याचे कोहली म्हणाला. मात्र, संघ मजबूत करण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आगामी सामने आणि पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक सामन्यांसाठी आपला संघ मजबूत असावा आणि संघात योग्य संतुलन असावे, या दृष्टीने काही निर्णय घेण्यात आले आहेत. नवीन खेळाडूंना संघात संधी देण्यात येत आहेत. संघाशी त्यांचा योग्य ताळमेळ बसावा आणि आतंरराष्ट्रीय स्तरावरील खेळासाठी ते तयार व्हावेत, हा या निवडीमागचा हेतू असल्याचे कोहलीने स्पष्ट केले.

नव्या खेळाडूंना संधी देऊन त्यांचा संघाशी ताळमेळ जमल्यास संघ निश्चितच बळकट होईल. संघातील सर्व खेळाडू याच प्रक्रियेतून आले आहेत. त्यामुळे नव्या खेळाडूंना संधी देण्यासाठी काही खेळाडूंना संघात स्थान देणे शक्य नसल्याचे त्याने सांगितले. कर्णधार म्हणून संघाकडे अनेक पर्याय असणे गरजेचे आहे. त्यामुळे काही बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या खेळाडूंना संधी मिळत असल्याने त्यांच्यासोबत खेळण्यात आनंद मिळत असल्याचेही कोहलीने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या