Virat Kohli Retirement – रोहित शर्मा पाठोपाठ विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार, BCCI ला निर्णय कळवला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटला रामराम गेला. मंगळवारी सोशल मीडियावर एक पोस्ट करा रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचा जाहीर केले. ऐन इंग्लंड दौऱ्याच्या तोंडावर रोहितने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. या धक्क्यातून सावरत नाही तोच रनमशीन विराट कोहली हा देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात आहे. मला कसोटी क्रिकेट मधून निवृत्त व्हायचे आहे, असा निरोप त्याने भारतीय क्रिकेट नियमक मंडळ अर्थात बीसीसीआयला कळवला आहे. मात्र बीसीसीआयच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी त्याला या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे.

विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचे मन बनवले असून याबाबत त्याने बोर्डालाही कळवले आहे. मात्र इंग्लंडचा महत्त्वाचा दौरा जवळ येत असल्याने बीसीसीआयने त्याला आपल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली आहे. मात्र अद्याप विराटने याबाबत बीसीसीआयला कळवलेले नाही, असे सूत्रांनी सांगितल्याचे वृत्त ‘इंडियन एक्सप्रेस‘ने दिले आहे.

हिंदुस्थानचा संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. जून महिन्यात या मालिकेचा शुभारंभ होईल. 20 जून ते 25 जुलै या काळात हे सामने खेळले जाणार आहेत. या मालिकेसाठी आगामी काही दिवसात हिंदुस्थानचा संघ जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच रोहित शर्माने निवृत्ती घेतली आणि आता विराट कोहली याने निवृत्तीबाबत बीसीसीआयला कळवले आहे.

दरम्यान, विराटने निवृत्तीबाबत पुनर्विचार केला नाही तर इंग्लंड दौऱ्यावर दोन अनुभवी खेळाडूंशिवाय हिंदुस्थानला मैदानात उतरावे लागेल. नव्या कर्णधारासह केएल राहुल, शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत यांच्यावर टीम इंडियाची धुरा सांभाळावी लागेल.

यशस्वीला मुंबईकडूनच खेळायचेय! दोन आठवडय़ांतच गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला मागे

विराट कोहली याने हिंदुस्थानकडून 123 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये त्याची सरासरी घसरली असून त्याने 37 लढतीत 3 शतकांसह 1,990 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतही त्याच्या बॅटमधील धावांचा ओघ आटलेला दिसला. त्याने 5 लढतीत 23.75 च्या सरासरीने धावा केल्या. यात कसोटी मालिकेत तो 7 वेळा ऑफ स्टंपच्या बाहेरच्या चेंडूवर बाद झाला होता. याआधी विराटने गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.