
कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहलीने प्रथमच मौन सोडले आहे. एका कार्यक्रमादरम्यान विराट कोहली म्हणाला की, ‘नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही’. विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका 1-2 ने गमावल्यानंतर अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले होते. याआधी त्याला टी-20, वनडेचे कर्णधारपद देखील सोडावे लागले होते.
टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली म्हणाला आहे की, तुम्हाला हे पूर्णपणे स्पष्ट असले पाहिजे की तुम्ही कोणते लक्ष्य साध्य करण्याचा विचार केला होता, तुम्ही ते करू शकलात की नाही. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक फलंदाज म्हणून तुम्ही संघासाठी अधिक योगदान देऊ शकता, ही बाब अभिमानास्पद असल्याचे तो म्हणाला आहे.
विराट कोहलीने एमएस धोनीचे दिले उदाहरण
विराट कोहली म्हणाला की, ‘नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला कर्णधार असण्याची गरज नाही. जेव्हा एमएस धोनी संघात होता तेव्हा त्याचा अर्थ असा नव्हता की तो नेता नव्हता. कर्णधारपद सोडल्यानंतरही तो असा होता ज्यांच्याकडून आम्हाला इनपुटची गरज होती. जिंकणे किंवा हरणे तुमच्या हातात नाही, तुम्ही फक्त दररोज चांगले बनण्याचा प्रयत्न करू शकता.’
दरम्यान, कर्णधार म्हणून विराट कोहलीचा कसोटी रेकॉर्ड खूपच चांगला आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली 40 सामने जिंकले आहेत. जे कोणत्याही हिंदुस्थानी कर्णधारासाठी सर्वाधिक आहे. जेव्हा विराट कोहलीचे टी-20, वनडेचे कर्णधारपद काढून घेण्यात आले, तेव्हा सर्वांना विश्वास होता की, तो कसोटी कर्णधार म्हणून कायम राहील. कारण त्याने नवीन संघ तयार करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले होते. पण दक्षिण आफ्रिका मालिकेनंतर आलेल्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.




























































