Breaking – विराटचे धक्कातंत्र कायम, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने गुरुवारी हिंदुस्थानच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. यूएई आणि ओमानमध्ये आयोजित आगामी टी-20 विश्वचषकानंतर तो टी-20 संघाचे कर्णधारपद सोडणार आहे. एवढेच नाही तर विराट कोहली याने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे. आयपीएल 2021 ची सांगता झाल्यानंतर आपण कर्णधारपदावरून पायउतार होणार असल्याचे विराट म्हणाला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार म्हणून ही माझी अखेरची आयपीएल स्पर्धा असणार आहे. एक खेळाडू म्हणून मी माझा शेवटचा आयपीएल सामना खेळेपर्यंत आरसीबीच्या संघात असेल, असे विराट कोहली म्हणाला. तसेच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि मला पाठिंबा दिल्लाबद्दल आरसीबीच्या सर्व पाठिराख्यांचे आभार, असेही तो म्हणाला. या संदर्भात एक व्हिडीओ आरसीबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर शेअर केला आहे.

बंगळुरुचे संघ व्यवस्थापन, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ, खेळाडू आणि संपूर्ण आरसीबी कुटुंबाचे मी आभार मानतो, ज्यांनी संघाच्या वाढीत महत्त्वाचे योगदान दिले. कर्णधारपद सोडणे हा सोपा निर्णय नव्हता, परंतु संघाच्या हितासाठी हा निर्णय घेतला. क्रिकेटमधून निवृत्त होईपर्यंत मी आरसीबीसाठी खेळणार, असेही कोहली म्हणाला.

विराट कोहली आयपीएलच्या सुरुवातीपासून आरसीबीच्या संघात आहे. 2011 मध्ये त्याच्याकडे संघाचे कर्णधारपद सोपण्यात आले, मात्र अद्याप तो संघाला एकदाही विजेतेपद जिंकून देऊ शकलेला नाही. विराटने 132 लढतीत आरसीबीचे नेतृत्व केले. यात त्याने संघाला 62 लढतीत विजय मिळवून दिला, तर 66 लढतीत पराभव स्वीकारावा लागला.