श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; नौदलाच्या कर्मचाऱ्याकडून प्रेयसिची हत्या, मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये लपवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील महिला, मुली यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिलांचे अपहरण, अत्याचाराच्या रोज नवीन बातम्या समोर येत आहेत. यापूर्वी दिल्लीत श्रद्धा वालकर हत्याप्रकरणाने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. याच घटनेची पुनरावृत्ती विशाखापट्टणमध्ये घडली. येथील गाजुवाका परिसरात एका 35 वर्षीय व्यक्तीने एका 29 वर्षीय महिलेची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सी. एच. रविंद्र (35) असे त्या व्यक्तीचे नाव असून तो नौदल कर्मचारी होता. तर मोनिका (29) असे त्या मृत महिलेचे नाव होते. आरोपी रवींद्र याचे मोनिका यांचे प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वीच रविद्रची पत्नी त्याला सोडून गेली होती. यानंतर रविवारी दुपारी रवींद्रने मोनिकाला आपल्या घरी बोलावले होते,मात्र तिथे दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. या वादातून रागाच्या भरात रवींद्रने मोनिकावर वार करून तिची हत्या केली.

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपीने स्वत: केलेल्या कृत्याबाबत कोणालाही माहिती मिळू नये यासाठी मोनिकाच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्याने शरीराचे काही भाग पिशवीत भरून निर्जन स्थळी नेऊन नष्ट केले, तर उर्वरित भाग आपल्या घरातील फ्रीजमध्ये लपवून ठेवले. आरोपीची पत्नी काही दिवसांपासून माहेरी गेली असल्याने तो घरात एकटाच होता, ज्याचा फायदा घेत त्याने हे अमानवीय कृत्य केले.

या थरारक घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून मोनिकाच्या शरीराचे काही भाग जप्त केले आहेत, मात्र अद्याप मृतदेहाचे शिर सापडलेले नाही. बेपत्ता असलेले अवयव शोधण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.