हिंदूंनी पन्नास मुलांना जन्म दिला पाहिजे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असणारे भाजपचे उत्तर प्रदेशातील आमदार सुरेंद्र सिंह यांनी बुधवारी प्रत्येक हिंदूने पाच मुलांना जन्म दिला पाहिजे असे वादग्रस्त विधान केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर टीका करताना प्रसिद्ध गायक व संगीतकार विशाल ददलानी याने हिंदूंनी पाच नाही तर पन्नास मुलांना जन्म द्यायला हवा असे वक्तव्य केले आहे. ददलांनी यांनी ट्विट करत शेतकरी आणि रोजगाराकडे लक्ष न देता, फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी योजना आखावी अशी टीका केली आहे.

ट्विटरवरून ददलानी यांनी भाजप नेत्याची बातमी शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. ‘फक्त पाचच का? प्रत्येकाने ५० मुलं जन्माला घालावी. सध्या आपली लोकसंख्या फक्त १.३५ अब्ज आहे, चला २०२२ च्या आत लोकसंख्या दोन अब्ज पर्यंत वाढवूया. यासाठी एक अधिकृत योजनाच का तयार करत नाही तुम्ही? शेतकरी आणि रोजगार योजना राहू दे बाजूला, आपण यावर लक्ष देऊया’, असं ददलानी याने म्हटलं आहे.

हिंदुत्व वाचवण्यासाठी प्रत्येक हिंदूने कमीतकमी पाच मुलांना जन्म द्यावा असे वादग्रस्त विधान सुरेंद्र सिंह यांनी बुधवारी केले होते. हिंदू बहुसंख्य असतील तरच हिंदुत्व वाचेल, त्यामुळे प्रत्येक हिंदूने आपली लोकसंख्या वाढवण्यासाठी पाच मुलांना जन्म द्यावा असे ते म्हणालेले. त्यांच्या या विधानावर सध्या सर्व स्तरातून टीका होत आहे.