विशेष – भारतीय संस्कृतीचा महासमन्वयक

>> विशाल फुटाणे

अनेक धार्मिक पंथ, हजारो जाती, भाषा, वैचारिक मतमतांतरे, विभिन्न उपासना, स्वतंत्र पूजा पद्धती अशा अनेक धर्मांचे दर्शन शास्त्राचे जन्मस्थान असणाऱया या भारत देशाचा आत्मा ‘समन्वय’ आहे. हा समन्वय भारतीयांच्या धर्मग्रंथातून, पुराणातून, वेद वाङ्मयातून दिसून येतो. आज अनेक रुढी, परंपरा, भाषा, जाती, पंथ, अनेक धर्मांचे लोक गुण्यागोविंदाने राहण्याच्या पूर्वी या देशात प्राचीन काळात वैदिक-अवैदिक, तांत्रिक, शाक्त, बौद्ध, जैन, शेव, वैष्णव या पंथांत पराकोटीचा संघर्ष होता. अशा या संघर्षाच्या काळात गणेश या देवतेने हिंदू धर्माच्या एकत्रिकरणाची महासमन्वयकाची भूमिका निभावल्याचं दिसून येते.

भारतातल्या सर्व पंथांनी, त्यांच्या अनुयायी लोकांनी त्यांच्या नित्य उपासनेत कर्मकांडात श्री गणेश देवतेला आद्यपूजकाचा अर्थात प्रथम पूजेचा मान देऊन आद्यपूजेचा धार्मिक प्रश्न निकालात काढला. भारतीय देवदेवतांमध्ये आपल्या वैशिष्टय़पूर्ण रूपामुळे गणेश देवता लोकप्रिय झाली. आजच्या जाती धर्मात बरबटलेल्या समाजासाठी गणेश एक समन्वयकच आहे. सगळे भेदभाव विसरून गणेशासाठी लोक संघटित होतात, एकत्र येतात व भारतीय संस्कृतीच्या मूळ प्रवाहाला मजबूत करतात, ही गोष्ट अभिमानास्पद आहे.

अशा या पूजनीय व लोकप्रिय देवतेची देशविदेशातील उपासना व मूर्ती कलेचा मागोवा घेत हा लेखप्रपंच केला. यामध्ये यापूर्वी महाराष्ट्रातील नामवंत इतिहास व पुरातत्त्व संशोधक डॉ. केशव मधुकर ढवळीकर यांनी गणेश देवतेवर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. गणेशाची उपासना इतर धर्मात नेमकी कधी चालू झाली याविषयी अभ्यासकांचे एकमत आहे. यामध्ये साधारणत सहाव्या शतकात गणेश देवतेची पूजा बौद्धधर्मियात रुढ झाली. हिमाचल प्रदेशातील टॅबो मठात एक बौद्ध गणेशाचं चित्र आहे. तसेच एक बौद्ध शिल्पपट्टात बुद्धाच्या महानिर्वाणप्रसंगी उपस्थित असलेल्या इतर हिंदू देवीदेवतांबरोबर गणेशही त्या शिल्पात उपस्थित आहे, अशी समजूत आहे.

आज जगभरात गणेश देवता भारतीय संस्कृतीचा मुखवटा म्हणून ओळखली जाते. अगदी आजही ब्रह्मदेश, सथाम, कंबोडिया, जावा, बाली, बोर्निया ते बेट जपान, चीनपर्यंत गणेशाच्या मूर्ती व उपासना बघायला मिळतात. पश्चिम देशात तुर्कला व मॅक्सिकोपर्यंत प्राचीन गणेशमूर्ती सापडत. प्राचीन भारतात प्रसिद्ध अशा नालंदा विद्यापीठात आलेल्या चिनी विद्वानांनी बौद्ध धर्मग्रंबासोबत भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून गणेश देवतेला आदराने चीनमध्ये नेले. गणेश हे दैवत तात्विक अर्थपूर्ण मूर्तीमुळे जगभरात पोहोचले आहे. जगभरातील देशांमधील गणेशमूर्ती व उपासना पद्धतीचा विचार करता अनेक आशियायी देशात आज वेगवेगळय़ा गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. नेपाळमध्ये आजही हिंदू व बौद्ध है गणेशाची पूजा करतात. प्रत्येक बौद्ध मठाच्या प्रवेशद्वारपट्टीवर गणेशाची मूर्ती कोरलेली आढळते. इथे हिंदू व बौद्ध धर्मीय लोक प्रत्येक कार्यात यश मिळावे म्हणून सर्वप्रथम गणेशाला आवाहन करीत असत. सम्राट अशोकाने बौद्ध धर्माचा प्रसार व प्रचाराकरिता त्याची कन्या संघमित्राला नेपाळमध्ये पाठविले होते तेव्हा संघमित्राने काठमांडू खोऱयात एक गजमुखी देवाचे मंदिर बांधल्याची कथा प्रसिद्ध आहे. या भागात बौद्ध धर्मात गणेशाला स्थान मिळाल्याचे मुख्य कारण म्हणजे श्री गणेश बुद्धांच्या महापरिनिर्वाणाप्रसंगी हजर होते, अशी समजूत असल्याचे मानले जाते. नेपाळमध्ये बौद्ध देवता संघात गणेशाला विनायक म्हणूनही ओळखले जाते. त्याचप्रमाणे श्रीलंकेत मिहितले येथे बौद्ध स्तुपात अनेक कोरीव शिल्पे आहेत. त्यात इतर गणाबरोबर गजमुखी गण आहे. ते शिल्पपट्ट अगदी आंध्रमधील अमरावती येथील स्तुपावरील शिल्पपट्टागप्रमाणे आहे. श्रीलंकेत गणेशाला ‘गणदेयो’ म्हणतात.

इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून भारतीय व्यापारी व्यापाराच्या निमित्ताने जगभरात फिरत होते. यात आशिया खंडातील चीन, जपान, कंबोडिया, थायलंड, इंडोनेशिया या देशात जायची. इकडे बोलनखिंडीत प्राचीन भारतीय व्यापार अरबी व्यापारी लोकांनी बळकावला. सहाव्या शतकात पाक्षात्त्य व युरोपातील भारतीय व्यापाराला अरबामुळे ओहोटी लागली होती. तेव्हा भारतीय व्यापारी लोकांनी आग्रेय आशियाकडे सागरी व्यापारी संबंध जोडण्यास सुरुवात केली. समुद्रातून होणारा जीवघेणा प्रवास निर्विघ्न पार पडावा म्हणून भारतातील लोक सोबत गणेश प्रतिमा ठेवत व आपल्या वसाहतीच्या देशात ती स्थापन करून उपासना करीत. अशा माध्यमातून विघ्नहर्त्या गणेशाला व्यापारी मंडळींनी भारताबाहेर नेले.

भारतात प्राचीन काळापासून जैन समाज व्यापार व्यवसायात अग्रेसर होता. सागरी प्रवासात विघ्नहर्ता रक्षण करेल,असे मानत जैन व्यापार्यांमार्फत जैन धर्मात गणेशाचं स्थान निर्माण झालं. 15 व्या शतकातील जैन पंडित वर्धमान सुरीच्या आचार दिनकर’ या ग्रंथात प्रत्येक शुभकार्यात जैनांनी गणेशाला आवाहन करावे असे सांगितले आहे. हेमचंद्राच्या ‘अभिधान चितामणी’ या ग्रंथात गणेशाची अनेक नावे दिली आहेत. जैन धर्मात अनेक उपदेवतामध्ये लक्ष्मी व गणेशाला स्थान मिळाल्याचं दिसून येतं. जैन धर्मीय गणेशाची अतिप्राचीन मूर्ती इसवी सन 8 व्या शतकातील आहे. त्या मूर्तींसोबत गणेशाची शक्ती अंबिका आहे. नाशिक येथील जैन लेणीमध्ये तीर्थकारासमवेत असलेल्या समूहात गणेश पाहावयास मिळतो. आहाड (राजस्थान) येथील पार्श्वनाथ मंदिरातील गणेश ललित आसनात असून मांडीवर विघ्नेश्वरी आहे. तसेच गुजरातमधील कुंभारिया येथील महावीर मंदिरात गणेश प्रतिमा शक्तीसह विराजमान आहे. ही मूर्ती आठव्या शतकातील असून याला चार हात व मागे प्रभावळी आहे. या मूर्तींचे वैशिष्टय़ असे आहे की, याची सोंड कपाळातून निघते.

गणेशाचे जसे बौद्ध, वैदिक व जैन वाङ्मयात उल्लेख येतात तसेच अनेक तांत्रिक पंथाच्या ग्रंथात संदर्भ सापडतात. तांत्रिक बौद्ध ग्रंथात गणेश हा श्रेष्ठ देव असल्याचे सांगून त्याला अनेक शिर व अनेक हात असतात व त्यास अनेक शक्तिदेवता असल्याचे म्हटले आहे. याचा पुरावा म्हणजे अनेक तांत्रिक ग्रंथात वर्णिल्याप्रमाणे ध्यान करीत असलेल्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या पाच शिर असलेल्या गणपतीस ‘हो’ गणपती म्हणतात. तो सिंहावर बसलेला असतो. पाच सोंडी, दहा हात, त्यातील दोन हात अभयमुद्रेत असतात, सोबत पाशं, कुश, मोदक, परशू, दात, माळ इत्यादी आयुधे असतात. या गणेशमूर्ती बांगलादेशात मिळाल्या आहेत. बंगालच्या परिसरात पूर्वीपासूनच तांत्रिक शाक्तांचा प्रभाव असल्याने गणेशभक्ती व उपासनेतून मूर्ती कलेत याचे प्रतिबिंब पडल्याचे दिसते.

परदेशातील गणेशमूर्ती व उपासनेचा विचार करता आग्रेय आशियातच प्रामुख्याने गणेशमूर्ती सापडल्या आहेत. यात बाली देशात अनेक गणेशमूर्ती पाहावयास मिळतात. म्यानमारच्या दक्षिणेकडील भागातही गणेश ही लोकप्रिय देवता असून त्यास महापियेन म्हणून ओळखलं जातं. आयलंड देशात गणेशाच्या पाषाणात कोरलेल्या आणि ब्राँझच्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. बोर्निओ देशाचा वायुपुराणात वरूणद्वीप म्हणून उल्लेख आला आहे. या देशातील कोटाई येथे सापडलेल्या संस्कृत शिलालेखावरून या काळात इवे हिंदू धर्माचा प्रभाव असल्याचं स्पष्ट होतं, येथील सापडलेल्या गणेशमूर्ती प्राचीन असून इंडोनेशिया येथील मूर्तींप्रमाणे तिच्या पायाचे तळवे एकमेकाला चिकटलेले आढळतात.

अनेक धर्मांचे जन्मस्थान असणाऱया या भारत देशाचा आत्मा ‘समन्वय’ आहे. हा समन्वय भारतीयांच्या धर्मग्रंथातून, पुराणातून, वेद वाङ्मयातून दिसून येतो तसा दैवतीकरणातही दिसतो. सध्याच्या जाती धर्मात बरबटलेल्या समाजात गणेश देवता महासमन्वयकाची भूमिका पार पाडत आहे.

गणेश देवतेला वैदिक किंवा अवैदिक देवता म्हणायचे, यात अभ्यासकांत वेगवेगळी मते पाहावयास मिळतात, परंतु वैदिक वाङ्मयात गणेशाला परब्रह्माचं प्रतिरूप मानलं आहे. हिंदू दर्शन शास्त्रानुसार एकच ब्रह्म या सृष्टी व चराचरात असून ब्रह्मा, विष्णू व महेश ही तीन वेगवेगळी रूपं तीन तत्त्वात विभक्त आहेत. या तीन तत्त्वाच्या मूळ ब्रह्मत्वाचं प्रतीकात्मक रूप म्हणजे गणपती असल्याचं पुराणात सांगितलं आहे. म्हणून ती आद्यपूजक आहे. अतिप्राचीन वाङ्मयामध्ये गणपतीचा प्रत्यक्षात वेदसंहितांमध्ये ‘गणेश’ हा शब्द नाही. आज आपण जी गणेशमूर्ती पाहतो, त्या स्वरूपातील देवता रूपांतरण हे नंतरच्या ब्राह्मण, आरण्यक आणि उपनिषद साहित्यामध्ये सूचक पद्धतीने विकसित झालेले आहे. त्यानंतर स्मृतिग्रंथातूनही गणेशाचा उल्लेख आढळतो. वेद संहिता व ब्राह्मण ग्रंथाने गणेश देवतेच्या संदर्भात अनेक सूचक उद्गार गौरवान्वित केले आहेत.

[email protected]
(लेखक प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व संशोधक आहेत.)