अनेकांना ठकविणारा फटे पोलिसांना शरण; यूटय़ूबवरून व्हिडीओद्वारे गुंतवणूकदारांना धमकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यभर खळबळ उडवून देणारा बार्शीतील शेअर ब्रोकर, अनेकांना कोटय़वधी रुपयांना ठकविणारा विशाल फटे हा सोमवारी रात्री सोलापूर पोलिसांना शरण आला आहे. तो शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वतःहून हजर झाला असून रात्री उशिरापर्यंत अटकेची कारवाई सुरू होती. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. दरम्यान, पोलिसांना शरण येण्यापूर्वी फटे याने यूटय़ूबवरून व्हिडीओ व्हायरल करून गुंतवणूकदारांना धमकावल्याचेही समोर आले आहे. या व्हिडीओचीही पोलीस तपासणी करणार आहेत.

बार्शीसह तालुक्यातील अनेकांना कोटय़वधी रुपयांना गंडवून शेअर ब्रोकर विशाल फटे हा कुटुंबीयासह चार दिवसांपूर्वी फरार झाला होता. पत्नी व दीड वर्षाच्या मुलीसह फरार झालेला फटे याने सोमवारी सकाळी यूटय़ूब चॅनेलवरून व्हिडीओ व्हायरल करत पोलिसांसमोर हजर होण्याचे संकेत दिले होते. पोलिसांचे सायबर पथक त्यादृष्टीने तपास करत असताना सोमवारी रात्री विशाल फटे हा सोलापुरातील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. यावेळी तो एकटाच होता. पत्नी व दीड वर्षाच्या मुलीला त्याने नातेवाईकांकडे सोडले आहे. विशाल फटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून अटकेची कारवाई सुरू केली होती. अटकेनंतर वैद्यकीय तपासणी होणार असून मंगळवारी त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आहे. विशाल फटे याला ताब्यात घेतल्याच्या वृत्ताला पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दुजोरा दिला आहे. आत्तापर्यंत फटेविरुद्ध फसवणुकीचे 81 गुन्हे दाखल असून, साडेअठरा कोटीपेक्षा अधिक रकमेची फसवणूक केली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून गायब असलेला विशाल फटे अखेर सोलापूर पोलिसांना शरण आला आहे.

दरम्यान, पोलिसांना शरण येण्यापूर्वी दुपारी विशाल फटे याने यू-टय़ूब चॅनेलवर व्हिडीओ व्हायरल करीत गुंतवणूकदारांना धमकाविले आहे. फटे याने स्वतःच्या कुकर्माची बाजू घेत, ‘मी जवळच्या पोलीस ठाण्यात हजर होणार आहे. ज्यांना माझ्यावर विश्वास आहे, त्यांनी काही दिवस थांबावे, ज्यांना विश्वास नाही त्यांनी पोलिसांत जावे. फाशी झाली तरी बेहत्तर, आता सहन होत नाही. माझ्या कंपनीमध्ये केवळ वडिलांचे नाव आहे. ते लाभार्थी नाहीत. एवढी बदनामी सहन होत नाही. मी माझी पत्नी व दीड वर्षाच्या मुलीला घेऊन आत्महत्या करणार होतो; मात्र आता पोलीस ठाण्यात हजर होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका फटे याने व्हिडीओतून घेतली आहे. ‘मी अनेकांना गेल्या सहा महिन्यांत पैसे डबल कमावून दिले आहेत’, असेही त्याने स्पष्टीकरण दिले असून, या शेअर व्यवहारात वडील व भावाचा संबंध नसल्याचे त्याने स्पष्ट केले आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्याने तक्रारी घटल्या
सोमवारी सकाळी यू-टय़ूबवरून त्याचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेक गुंतवणूकदार बिथरल्याचे चित्र दिसत होते. दिवसभरात फक्त पाचजणांनी तक्रारी दिल्या व यात फसवणुकीची रक्कम अवघी 25 लाख आहे. त्यामुळे फटेचा व्हिडीओ हा गुंतवणूकदारावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याची चर्चासुद्धा सुरू आहे. आतापर्यंत 81 तक्रारी दाखल असून, रक्कम 18 कोटी 78 लाखांवर गेली आहे. त्यामुळे तक्रारदारांनी पुढे यावे, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.