
सामना ऑनलाईन, नांदेड
विष्णुपुरी प्रकल्प हा नांदेडला पाणीपुरवठा करणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून वर्षाला 38 दशलक्ष घनमीटर पाणी नांदेडकरांना पुरवठा करण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. मात्र गेल्या काही वर्षात अपुऱ्या पावसामुळे या धरणातील पाणीसाठा समाधानकारक नसतो. यंदा ही परिस्थिती काहीशी बदलेल अशी अपेक्षा आहे कारण या धरणातील पाणीसाठा वाढीस लागला असून प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर आला आहे. येत्या काही दिवसांत जर चांगला पाऊस झाला तर मग धरणात चांगला पाणीसाठा होईल अशी अपेक्षा आहे.
नांदेड जिल्ह्यातील मनार ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प आणि इतर मध्यम प्रकल्प यात फारसा पाणीसाठा नाही. हदगाव, हिमायतनगर, माहूर, किनवट वगळता अन्य तालुक्यात आजपर्यंत 40% ही पाऊस झाला नाही त्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे विष्णुपुरी प्रकल्प मृतसाठ्यातून आता जिवंत साठ्यात येत आहे. धरणाच्या वरच्या भागात पाऊस झाल्याशिवाय विष्णुपुरी प्रकल्पात पाणी येऊ शकणार नाही. हीच परिस्थिती उर्ध्व मानार आणि अप्पर मानारची आहे.


























































