Vishwakarma Puja : ‘विश्वकर्मा’ पूजेची तारीख का बदलत नाही ? जाणून घ्या 17 सप्टेंबरचं रहस्य

vishwakarma-puja

भगवान विश्वकर्मा हे शिल्पकारांचे उपास्य देव मानले जातात विशेष म्हणजे विश्वकर्मा जयंती दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येते. भगवान विश्वकर्मा यांना जगातील पहिले इंजिनिअर असेही मानले जाते. विश्वकर्मा यांनी देवांच्या महालांची रचना केली, त्यासोबत अस्त्र, शस्त्र निर्मिती देखील केली असेही सांगितले जाते. हिंदू धर्मात अशी मान्यताही आहे की, सर्व प्रकारची साधनं आणि लोखंडाची उपकरणं यावर भगवान विश्वकर्मा यांचा प्रभाव असतो. त्यामुळे या दिवशी मशीन आणि उपकरणांची पूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते.

हिंदू धर्मात तिथीनुसार सण – उत्सव साजरे केले जातात. त्यामुळे इंग्रजी दिनदर्शिकेनुसार सण, जयंती, पुण्यतिथींच्या तारखा बदलत असतात. मात्र असे असले तरी भगवान विश्वकर्मा यांची जयंती ही याला अपवाद आहे. विश्वकर्मा जयंतीची तारीख बदलत नाही. इंग्रजी दिनदर्शिकेनुसार भगवान विश्वकर्मा यांची जयंती ही निश्चित तारखेला म्हणजेच दरवर्षी 17 सप्टेंबर रोजी साजरी करण्यात येते. या मागचे कारण काय हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

खरंतर भगवान विश्वकर्मा यांच्या संदर्भात अनेकविध अशा मान्यता आहेत. काही धर्मशास्त्रींच्या मान्यतेनुसार भगवान विश्वकर्मा यांचा जन्म अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षात झाला असं मानण्यात येतं. तर काही लोकांच्या म्हणण्यानुसार विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद महिन्याच्या शेवटच्या तिथीवेळी झाला असे मानण्यात येते. तर तिथींपेक्षा वेगळी अशी एक मान्यता होती त्यानुसार भगवान विश्वकर्मा पूजा दिवस निश्चित करण्यात आला, तो म्हणजे सूर्याचे परागमन. या दिवसाला सूर्य संक्रांती म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. सूर्याचे संक्रमण याच दिवशी येते म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस भगवान विश्वकर्मा यांच्या पूजनाचा दिवस म्हणून साजरा करण्यात येऊ लागला.

व्यवसाय-उद्योगांत या दिवसाला अधिक महत्त्व दिले जाते आणि भगवान विश्वकर्मा यांची पूजा केल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात केली जात नाही. विवाह झालेल्या व्यक्ती जोडीने पूजा करतात. अशी देखील मान्यता आहे की, भगवान विश्वकर्मा यांनी ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करताना मदत केली होती आणि त्यांच्याच आदेशानुसार पौराणिक नगरं आणि राजाधान्यांची निर्मिती करण्यात आली होती. पौराणिक कथांनुसार भगवान विश्वकर्मा यांना तीन पत्नी असून रति, प्राप्ति आणि नंदी अशी त्यांची नावे आहेत. तसेच भगवान विष्णुचे सुदर्शन चक्र, भगवान शंकराचे त्रिशूळ आणि यमराजांचा कालदंड याचे निर्माण विश्वकर्मांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या