
सामना ऑनलाईन । पालघर
यंगस्टार्स ट्रस्ट, विरार व पालघर डिस्ट्रिक्ट कॅरम असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित पालघर डिस्ट्रिक्ट रोख पारितोषिकांच्या गुणांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत विरारच्या विश्वनाथ देवरुखकरने अटीतटीच्या दोन गेम रंगलेल्या रोमहर्षक लढतीत विरारच्याच द्वितीय मानांकित सचिन पवारची कडवी झुंज २५-२३, २५-२४ अशी मोडीत काढत अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. ही गुणांकन कॅरम स्पर्धा कै. भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन, विरार (पश्चिम), जिल्हा पालघर येथे खेळवण्यात आली.
विजेता विश्वनाथ देवरुखकरला रोख रु. ३,०००/-, मेडल व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. उपविजेता सचिन पवारला रोख रु. २,०००/-, मेडल व प्रमाणपत्र यावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात नालासोपाऱ्याच्या प्रमोद शर्माने विरारच्या बिपिन पांडेला दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात २५-४, २५-४ असा धुव्वा उडवीत रोख रुपये १०००/-, मेडल व प्रमाणपत्र मिळविले.


























































