
वरिष्ठ आयपीएस अधिकाऱयांच्या रखडलेल्या बदल्या अखेर झाल्या. नाशिकचे आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्यावर मुंबईतील कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदाची तर नवी मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी बिपीनकुमार सिंग यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँचच्या सहआयुक्तपदी मिलिंद भारांबे यांची वर्णी लागली आहे, तर दीपक पांडे यांना नांगरे-पाटील यांच्या जागी नाशकात पाठवण्यात आले आहे. याशिवाय विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.
पोलीस महासंचालक ते पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. ऍण्टी करप्शन ब्युरोचे अपर पोलीस महासंचालक बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या आयुक्तपदी, राज्य गुप्त वार्ता विभागाचे सह आयुक्त अमितेश कुमार यांची नागपुर आयुक्त, सुधार सेवा विभागाचे महानिरीक्षक दिपक पाण्डये यांना नाशिक शहरच्या आयुक्तपदी तर नाशिक ग्रामीणच्या अधीक्षक आरती सिंह यांच्याकडे अमरावती आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
बदल्या झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे – विशेष अभियानचे अपर पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग यांची अपर पोलीस महासंचालक कायदा व सुव्यवस्था, ऍण्टी करप्शन ब्युरोचे अपर पोलीस महासंचालक आशुतोष डुंबरे यांची राज्य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्त, लोहमार्गाचे अपर महासंचालक जय जीत सिंह यांची ऍण्टी करप्शनचे अपर महासंचालक, मुंबईचे सहआयुक्त विनयकुमार चौबे यांची अपर महासंचालक ऍण्टी करप्शन ब्युरो, नागपूरचे आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांची अपर महासंचालक राज्य वाहतूक विभाग, नवी मुंबईचे आयुक्त संजय कुमार अपर महासंचालक प्रशिक्षण व खास पथके या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई क्राईम ब्रँचच्या सहआयुक्तपदी मिलिंद भारांबे
प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱया मुंबई क्राईमच्या सहआयुक्तपदी मिलिंद भारांबे यांची वर्णी लागली आहे. तर मुंबईच्या कायदा व सुव्यवस्थेच्या सहआयुक्तपदी विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच मुंबईच्या वाहतूक विभागाचे सहआयुक्त म्हणून यशस्वी यादव आणि मुंबईच्या प्रशासन विभागाचे सहआयुक्तपदी राजकुमार व्हटकर यांची नियुक्ती झाली आहे.
मुंबईचे सहआयुक्त मधुकर पाण्डये यांची सागरी सुरक्षा व विशेष सुरक्षा विभागाचे विशेष महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांच्याकडे सुधार सेवेचे महानिरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. याशिवाय उपमहानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱयांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार डॉ. जय जाधव यांची नवी मुंबईचे सहआयुक्त, सिडकोचे दक्षता अधिकारी निसार तांबोळी यांच्याकडे नांदेड परिक्षेत्र, चंद्र किशोर मीना यांच्याकडे अमरावती परिक्षेत्रांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुणे उत्तर विभागाच्या अपर पोलीस आयुक्तपदी नामदेव चव्हाण, सिडकोचे दक्षता अधिकारी म्हणून एस.एच. महावरकर, लख्मी गौतम यांची ऍण्टी करप्शनचे उपमहानिरीक्षक, वीरेंद्र मिश्रा यांच्याकडे मुंबई सशस्त्र विभागाची जबाबदारी दिली आहे. पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांना गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे.
राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेचे अपर पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पोलीस महासंचालकपदी वर्णी लागली आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची तर मनोज लोहिया यांच्याकडे कोल्हापूर परिक्षेत्राची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबईतील अपर पोलिसांच्या नियुक्त्या
सत्यनारायण चौधरी यांच्याकडे दक्षिण प्रादेशिक विभाग, संदीप कर्णिक यांच्याकडे पश्चिम प्रादेशिक विभाग, संजय दराडे पूर्व प्रादेशिक, ज्ञानेश्वर चव्हाण यांच्याकडे मध्य प्रादेशिक विभाग, विरेश प्रभू यांची गुन्हे शाखेच्या अपर पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नागरी संरक्षण दलाला नवीन महासंचालक
राज्य शासनाने महासमादेशक होमगार्ड व संचालक नागरी संरक्षण दल या पदांची विभागणी करून संचालक नागरी संरक्षण हे पोलीस महासंचालक श्रेणीचे वेगळे पद निर्माण करण्यात आले आहे. त्यानुसार राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांची नागरी संरक्षण दलाच्या संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
मीरा–भाईंदरच्या आयुक्तपदी सदानंद दाते
केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून राज्यात परतलेले अपर पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे नव्याने स्थापन झालेल्या मीरा भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली, तर मुंबईच्या सशस्त्र विभागाचे अपर पोलीस आयुक्त एस. जयकुमार यांची मीरा-भाईदर, वसई-विरार आयुक्तालयात अपर पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आहे.




























































