
सामना प्रतिनिधी, मुंबई
‘शिवशाही’नंतर आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात पोलादी बांधणीची ‘विठाई’ बस येणार आहे. या बसमध्ये पारंपरिक ऍल्युमिनियम ऐवजी हलके पण मजबूत असे माईल्ड स्टील वापरण्यात आले आहे.
या बसेसना धार्मिक पर्यटनासाठी अष्टविनायक, कोकण व रायगड दर्शनासाठी वापरण्याचा विचार आहे, तसेच काही बसेसचे नाव ‘विठाई’ ठेवण्यात आले असून त्या पंढरपूर मार्गावर चालविल्या जाणार आहेत. एसटीच्या पुणे जवळील दापोडीच्या कारखान्यात प्रायोगिक तत्त्वावर अशा मजबूत स्टील बांधणीच्या दहा बसेसची निर्मिती करण्यात आली आहे.
आपत्कालीन मार्ग मोकळे!
एसटीच्या ‘लाल परी’ मॉडेलचे रुपांतर नव्या मजबूत बांधणीत करण्यात आले आहे. त्यात ऍल्युमिनियम ऐवजी हलके पोलाद वापरल्याने बसच्या खिडक्यांचा थडथड आवाज येणार नाही. 46 आसनांच्या या बसेसमध्ये इमर्जन्सी खिडक्यांच्या जागी असलेली आसने काढण्यात आली आहेत. त्यामुळे आपात्कालीन स्थितीत पुढे आणि मागे असे दोन मार्ग प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी उपलब्ध होतील.






























































