श्री विठ्ठल मंदिराच्या रस्त्यांवर आजपासूनच बॅरिकेडिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माघी यात्रेवर कोरोनाचे संकट असल्याने भाविकांनी पंढरपूरला येऊ नये. मंदिर समितीच्या वतीने दशमी व एकादशी या दोन दिवशी मंदिर बंद ठेवले आहे, तर जिल्हा प्रशासनाच्या वतीने दि. 23 रोजी एकादशी दिवशी संचारबंदी लागू केली आहे. मात्र, संचारबंदी उद्यापासून असली तरी मंदिराकडे जाणारे रस्ते, गल्ली-बोळ, चौकाचौकात बॅरिकेडिंग लावून त्याची तयारी प्रशासनाने आजपासूनच केल्याचे दिसून येते.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेल्या पंढरीतील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 17 मार्च 2020 पासून भाविकांना दर्शनाकरिता बंद ठेवले होते. मात्र, दिवाळी पाडव्यापासून म्हणजेच 16 नोव्हेंबरपासून नियम व अटी घालून मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आली. ती अद्यापि सुरू आहे. यामुळेच भाविक राज्यभरातून श्रींच्या दर्शनाकरिता पंढरीत येत आहेत. माघ वारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द होणार आहे. केवळ प्रातिनिधिक स्वरूपात साजरी होणार असल्याने भाविक माघी एकादशीच्या अगोदरच पंढरीत दर्शनाला येत आहेत. भाविकांची वाढती गर्दी कोरोनाच्या प्रसाराला पोषक ठरत असल्याने याचा विचार करून जिल्हा प्रशासनाने संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्यानुसार पोलीस विभागाकडून जिल्हास्तरावर, तालुकास्तरावर व पंढरपूर शहर स्तरावर अशी त्रिस्तरीय नाकाबंदी करण्यात येत असून, त्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आलेली आहे.

पंढरपूर शहराच्या प्रवेशद्वारावरील रस्त्यांवर, चौकात तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. तसेच श्री विठ्ठल मंदिराकडे जाणाऱया रस्त्यांवर, तसेच मुख्य चौकात बॅरिकेडिंग करण्यात आले असून, येणाऱया वाहनधारकांची तपासणी केली जात आहे. कोरोनाचे नियम मोडणाऱयांवर कारवाई केली जात आहे. बाहेरून आलेल्या भाविकांना पंढरपुरात प्रवेशच दिला जात नाही.

श्री विठ्ठल मंदिराकडे जाणारे रस्ते, गल्ली-बोळदेखील बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे संचारबंदी उद्या (दि. 22) रात्री 12 ते दि. 23 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत अशी 24 तास राहणार आहे. असे असले तरी पोलिसांकडून संचारबंदी आदेशाची तयारी रविवारपासूनच सुरू केली आहे.

पंढरीत माघी यात्रेच्या निमित्ताने भाविकांची होणारी गर्दी होऊ नये म्हणून पंढरपूर शहरासह परिसरातील 10 गावांमध्ये 24 तासांची संचार बंदी लागू करण्यात आली आहे. तसेच इतर राज्यांतून व राज्याच्या विविध भागातून येणाऱया दिंडीस व भाविकास प्रतिबंध करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्रिस्तरीय नाकांबदी करण्यात आली आहे. बाहेरील भाविकांनी मठात थांबू नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचा येईल.

– विक्रम कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी.

विनामास्क फिरणाऱयांना सव्वा लाखांचा दंड

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विनामास्क फिरणाऱया नागरिकांवर पोलीस प्रशासनाने, तर पंढरपूर नगरपरिषदेने दुकानदार व विक्रेत्यांवर धडक कारवाई सुरू केली असून, 1 लाख 27 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी उपविभागीय अधिकारी गजानन गुरव आणि मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर यांनी दिली आहे. दरम्यान, संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रांताधिकारी गुरव यांनी दिला आहे.