दै. ‘सामना’चे विठ्ठल देवकाते उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्काराने सन्मानित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, पुणे

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ऍड. नंदू फडके यांनी शिवरामपंत दामले यांच्या जागविलेल्या आठवणी… एअरमार्शल भूषण गोखले यांनी खेळासाठी सातत्याने कार्य करणाऱया महाराष्ट्रीय मंडळाची मुक्तकंठाने केलेली स्तुती… आपण अजूनही विद्यार्थीच असल्याची सत्कारमूर्ती राम भागवत यांची प्रांजळ कबुली… ज्येष्ठ शास्त्र्ाज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी शारीरिक शिक्षण आणि शरीर संवर्धनाचे पटवून दिलेले महत्त्व… अशा उत्तरोत्तर रंगत गेलेल्या कै. शिवरामपंत दामले क्रीडा पुरस्कार सोहळ्याला मंगेश वाघमारे यांच्या भारदस्त सूत्रसंचालनाने अक्षरशः चार चांद लागले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते ज्येष्ठ ऍथलेटिक्स प्रशिक्षक राम भागवत यांना मानाचा ‘कै. कॅप्टन शिवरामपंत दामले क्रीडा पुरस्कार’ देऊन, तर दै. ‘सामना’चे विठ्ठल देवकाते यांना कै. लेफ्टनंट जनरल यशवंतराव सहस्रबुद्धे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा उत्कृष्ट क्रीडा पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

ज्येष्ठ ऍथलेटिक्स प्रशिक्षक राम भागवत सत्काराला उत्तर देताना भारावून गेले होते. ते म्हणाले, मी महाराष्ट्रीय मंडळाच्या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याने माझ्याच मंडळाचा सर्वोच्च पुरस्कार मिळणे ही माझ्यासाठी संस्मरणीय घटना होय. कै. शिवाकाकांच्या प्रेरणेनेच माझा क्रीडा क्षेत्रात प्रवेश झाला. चांगल्या जगण्यासाठी व क्रीडाकौशल्य संपादन करण्यासाठी तसेच माणसाला सामर्थ्यवान होण्यासाठी शारीरिक स्वास्थ्य व ताकदीची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शारीरिक शिक्षण व आरोग्य संवर्धन चिरकालीन -माशेलकर
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, क्रीडा क्षेत्रात प्रचंड कार्य करणाऱया राम भागवतांसारख्या ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शकास माझ्या हस्ते पुरस्कार प्रदान करणे हा मी माझाच सन्मान समजतो. गुणवंत शिक्षकांच्या कार्याचाही या ठिकाणी झालेला गौरव नक्कीच कौतुकास्पद आहे. गुणवंत शिक्षकांमुळेच देश घडत असतो. ज्ञान, बुद्धी, व्यक्ती व मूल्य यांच्या संवर्धनाचे महत्त्वाचे कार्य शिक्षक करतात. शिक्षणातील बदल समजून घेणे आवश्यक आहे. यातील ज्ञान, बुद्धी हे बदलले आहेत, पण व्यक्ती संवर्धन व पर्यायाने शरीर संवर्धन यामध्ये काहीही बदल झालेले नाहीत. त्यामुळे शारीरिक शिक्षण व आरोग्य संवर्धन चिरकालीन आहे. गुणी शिक्षकांचा सन्मान करून प्रतिष्ठा राखण्याचे काम महाराष्ट्रीय मंडळ करत आहे.