मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही! पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची ग्वाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावर फिरताना मुंबईकरांना सुरक्षित वाटेल, पोलीस ठाण्यात येणाऱयांचे समाधान होईल, मुंबईच्या सर्वांगीण सुरक्षेसाठी आमचे प्राधान्य आहे आणि राहील. वेगवेगळी आव्हाने असली तरी मुंबई पोलीस आपल्या लौकिकेला साजेशी अशीच कामगिरी करेल, असे मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर विवेक फणसळकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पोलीस आयुक्त संजय पांडे आज सेवानिवृत्त झाले. विवेक फणसळकर यांनी संजय पांडे यांच्याकडून पोलीस आयुक्ताचा पदभार स्वीकारला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना फणसळकर यांनी मुंबईच्या सुरक्षिततेसाठी प्राधान्य होते आणि राहील असे सांगितले. कायदा व सुव्यवस्था, वाहतूक आणि दहशतवादाचा धोका अशी आव्हाने मुंबईसमोर आहेत. पण मुंबई पोलिसांनी नेहमीच शहराचे वातावरण सुरक्षित ठेवले असून यापुढेही त्यात कोणतीही तडजोड होणार नाही. महिला, बालके, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी जी काही चांगली कामे करता येईल ती करणार. जगात मुंबई पोलिसांचा नावलौकिक आहे. त्याला तडा जाणार नाही. उलट पोलिसांचा नावलौकिक आणखी कसा चांगला होईल हे आम्ही आमच्या कामातून दाखवून देऊ, असा विश्वास फणसळकर यांनी व्यक्त केला. पोलीस दलात ज्या काही चांगल्या योजना सुरू केल्यात त्या चालूच राहतील. नागरिकांना चांगल्या सुविधा देणे, पोलीस ठाण्यात नागरिकांना चांगली वागणूक मिळेल, त्यांचे प्रश्न सोडविण्याबरोबर पोलिसांकडून संयमाने काम कसे केले जाईल यावर आमचा भर राहील, असेही फणसळकर म्हणाले. तसेच मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी माझी नियुक्ती केली त्याबाबत शासनाचे आभार त्यांनी व्यक्त केले.

जातीय सलोखा अबाधित राखू

शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेबरोबरच जातीय सलोखा अबाधित राखण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करू. त्यात कुठलीही तडजोड केली जाणार नाही आणि त्यासाठी आपले पोलीस दल सक्षम असल्याचे यावेळी फणसळकर म्हणाले.