गुळ्या-पुळ्याचा गणपती

>> विवेक दिगंबर वैद्य

रत्नागिरीनजीक स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘पावस’ या पुण्यक्षेत्रापासून तीन किमीवर ‘आगरगुळे’ हे गाव आहे, जे सध्या ‘गणेशगुळे’ नावाने प्रसिद्ध आहे. ‘भंडारगुळे’ ही तत्कालीन ओळख जागवणारा असा, समुद्राच्या पुळणीने (वाळूने) व्यापलेला हा परिसर ‘लंबोदर’ गणरायाच्या आगमनाने ‘क्षेत्रमाहात्म्य’ म्हणून प्रसिद्धीस आला.

क्रोधासुराचे पारिपत्य करण्यासाठी अवतरलेला लंबोदर जिथे महाकाय स्वरूपात स्थापन झाला तो डोंगरसदृश परिसर हेच सध्या प्रसिद्धीस पावलेले ‘गणेशगुळे’ व ‘गणपतीपुळे’ क्षेत्र आहे. जनवस्तीपासून दूर आणि झाडाझुडपांमुळे ‘गायरान’ अशी ओळख लाभलेला हा परिसर उत्तरेकडील नेवरे व दक्षिणेकडील मालगुंड गावच्या सीमारेषेवर वसलेला मात्र तरीही उपेक्षित होता. डोंगरपायथ्याशी लगट करणारी समुद्राची साथ, पुळणीची सोबत व पलीकडे दर्यावर्दी भंडारी समाजाची वस्ती यामुळे ‘भंडारगुळे’ ही तत्कालीन ओळख जागवणारा असा, समुद्राच्या पुळणीने (वाळूने) व्यापलेला हा परिसर ‘लंबोदर’ गणरायाच्या आगमनाने ‘क्षेत्रमाहात्म्य’ म्हणून प्रसिद्धीस आला.

‘भिडे’ कुलवृत्तांतानुसार या परिसराला लंबोदराचा साक्षात्कार होण्याचा काळ साधारणतः चार शतकांपूर्वीचा आहे. हिंदुस्थानात सर्वत्र यावनी हुकूमत असताना डोंगरपायथ्याशी केवडय़ाचे बन आणि घनदाट झाडीने व्यापलेला हा सिद्धगणेश महास्थानाचा परिसर कासार ज्ञातीमधील एका वहिवाटदाराच्या अखत्यारीत होता. काही कारणाने ही वहिवाट नजीकच्या उंडी (किंवा निवेंडी) गावच्या भिडे घराण्याकडे आली. वहिवाट, मालकी हक्क आणि गावचे ‘खोत’पण भिडे यांच्याकडे होते. एका प्रसंगी भिडे कुटुंबातील कुण्या गृहस्थावर मोगलाईच्या जाचक अमलातून आकस्मिक आपत्ती ओढवली तेव्हा या संकटातून सुटका होण्यासाठी त्यांनी विघ्नहर्त्या श्रीमंगलमूर्तीची साधना केली.

समुद्रपायथ्याशी असलेल्या केतकबनात अन्नग्रहण वर्ज्य करून ते श्रीगणरायाची आराधना करते झाले. तेव्हापासून तिसऱया दिवशी त्यांना घडलेल्या स्वप्न दृष्टांतामध्ये ‘‘मी आगरगुळे येथून भक्तकामनार्थ येथे ‘दंत’युक्तरूप धारण करून प्रकट झालो आहे. सद्य स्वरूपामागील डोंगर हेच माझे निराकार रूप आहे. तू माझा शोध घे आणि पूजाअर्चा अनुष्ठानादी कर्माने माझी प्रसिद्धी कर. म्हणजे तू संकटमुक्त होशील.’’ असे लंबोदर गणराय सांगते झाले. ‘आगर’ गावाच्या डोंगरावर असलेली झाडाझुडपांची गर्दी हटवून भिडे यांनी स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला असता त्यांना दृष्टांतानुसार ‘दंत’युक्त श्रीगणेशाचे दर्शन घडले. आनंदित झालेल्या भिडे यांनी हे स्थान शुचिर्भूत करून तिथे गवताचे छप्पर असलेला आडोसा उभारला आणि ते नित्यनेमाने या ‘गणेश’स्वरूपाची पूजाअर्चा करू लागले. अल्पावधीतच सिद्धगणेशाच्या वचनानुसार ते संकटमुक्त झाले. या घटनेमुळे पुढे या ‘गणेश’स्थानाचे माहात्म्य सर्वत्र सर्वदूर पसरले आणि प्रसिद्धीस आले.

रत्नागिरीनजीक स्वामी स्वरूपानंद यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या ‘पावस’ या पुण्यक्षेत्रापासून तीन किमीवर ‘आगरगुळे’ हे गाव आहे, जे सध्या ‘गणेशगुळे’ नावाने प्रसिद्ध आहे. स्वप्नदृष्टांतामध्ये दिसलेला डोंगरावरील गणपती डोंगरपायथ्याशी असलेल्या समुद्रकाठी ‘पुळणी’मध्ये (वाळूत) आला आणि ‘गणपतीपुळे’ नावाने ख्यातकीर्त झाला. त्याचा पूर्वार्ध पुढील कथेनुसार आहे.

पोटशूळाच्या व्याधीने त्रासलेले ‘पावस’चे रामचंद्रपंत चिपळूणकर दुखणे विकोपाला गेल्याने कंटाळून आत्महत्या करण्यास निघाले. समुद्रात उडी टाकून जीव देण्याकरिता निघालेल्या चिपळूणकरांना अर्ध्या वाटेत प्राणांतिक वेदना होऊ लागल्या. तेव्हा वेदनेने कासावीस झालेल्या चिपळूणकरांना त्या रात्री श्रीगणरायाने स्वप्नदृष्टांत देत सांगितले, ‘‘येथील विहिरीचे पाणी तू प्यायलास तर तू व्याधीमुक्त होशील. मात्र, त्यानंतर या परिसरात तू माझे स्थान निर्माण कर.’’ स्वप्नदृष्टांतानुसार रामचंद्रपंतांनी विहिरीचा शोध घेऊन तिथले पाणी प्यायले. त्यानंतर त्यांचा पोटशूळ शमला व कायमचा निघून गेला. हा पुण्यानुभव जमेस धरून रामचंद्रपंतांनी त्या परिसरात श्रीगणेशाचे मंदिर उभारले.

अकरा फूट उंच व तीन फूट रुंदीची ही निराकार शिळा म्हणजेच गणेशगुळ्याचा गणपती. दर्यावर्दी मंडळींनी ‘गलबतवाल्यांचा गणपती’ असे याचे नामकरण केले आहे. गणेशगुळे येथे डोंगरावर वसलेला हा गणपती निराकार पाषाणात चैतन्य निर्माण करता झाला. हा निराकार स्वयंभू धुंडीराज पुढे डोंगरपायथ्याशी ‘दंत’युक्तरूप धारण करता झाला. म्हणूनच ‘गुळ्याचा गणपती पुळ्याला आला’ अशी याची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली. गुळ्याचा गणपती हा पुळ्याच्या गणपतीहून प्राचीनत्व लाभलेला आहे. समुद्रकिनारी वसलेल्या या तीर्थस्थानांना छत्रपती श्रीशिवाजीराजे, सरदार गोविंदपंत बुंदेले, श्रीमंत बाळाजी बाजीराव व रघुनाथराव पेशवे, सरदार परशुरामभाऊ, श्रीमंत आप्पासाहेब आणि सिद्धपुरुष हरीभटबाबा पटवर्धन यांचे प्रसंगोत्पात येणे झाल्याचे सांगण्यात येते. पुळ्याचे मंदिर उभारताना श्रीमंत सौ. रमाबाई पेशवे, श्रीमंत सयाजीराजे गायकवाड तसेच गुळ्याचे मंदिर उभारताना श्रीमंत शाहू महाराजांचे साहाय्य लाभलेले आहे.

गुळ्या-पुळ्याच्या डोंगराला श्रीगणपतीचे निराकार रूप मानण्यात येते. या परिसरात खळाळत वाहणाऱया जिवंत झऱयाला श्रीगणेशाची ‘नाभी’ मानले जाते. हे स्थान समुद्रकिनाऱयानजीक आहे तरीदेखील या झऱयातून वाहणारे पाणी मात्र चवीला गोड आहे. वर्षातून दोनवेळा पुळ्याच्या गणपतीमूर्तीवर थेट सूर्यकिरणे पडतात. या परिसरात अनेक अनाम साधू-सत्पुरुषांच्या समाध्या आहेत. पुळे येथील गणपती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर ‘मोरया’ देवाची स्थापना केलेली आहे. मालगुंड येथील भंडारी ज्ञातीच्या गृहस्थाचे समुद्री वादळातून बुडणारे गलबत या ठिकाणी आले व स्थिर झाले म्हणून त्या गृहस्थाने येथे घुमटी बांधून ‘मोरया’देवाची स्थापना केली आणि दीपमाळा उभारली. रत्नागिरीपासून हे क्षेत्र आरेवारेमार्गे अंदाजे 26 कि.मी. चिपळूणपासून 86 कि.मी. आणि सावंतवाडीपासून 200 कि.मी. अंतरावर आहे.
गणेशगुळे आणि गणपतीपुळे हे प्राचीनत्वाचा वारसा लाभलेले, डोंगर व समुद्रसपाटीचा एकत्रित अनुभव देणारे, निसर्गाची मुक्त उधळण मनमुराद आनंद लुटू देणारे असे धार्मिक पर्यटनस्थळ आहे. उत्तम निवास व भोजन व्यवस्था हे इथे येण्याचे आणखी एक कारण आहे. येथून जवळच कवी केशवसुतांचे मालगुंड, प्रसिद्ध जयगड बंदर व किल्लादेखील आहे. त्याविषयीची एकत्रित माहिती पुढील लेखामध्ये.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या