श्री देव ‘मार्लेश्वर’

>> विवेक दिगंबर वैद्य

सह्यगिरी पर्वतरांगांच्या कडेकपारीत शिखरावर वसलेले ‘श्री मार्लेश्वर’ देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून आणि आंगवली गावापासून सुमारे 15 कि.मी.च्या परिघात आहे. श्री देव मार्लेश्वर हे शंभूमहादेवाचे स्वयंभू स्थान असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती आहे.

सर्वत्र शोध घेतल्यावरही पाणी मिळेना म्हणून सर्वजण हैराण झाले होते. इतक्यात त्यांच्यातील एकाचे लक्ष शिकारी कुत्र्याकडे गेले. त्या कुत्र्याचे सर्वांग पाण्याने भिजलेले होते. ज्या अर्थी हा कुत्रा पाण्याने भिजून आलेला आहे त्या अर्थी जवळपास एखादा ओढा, ओहोळ किंवा पाण्याने वाहणारा धबधबा असावा असा कयास काढून सर्वजण पुन्हा शोध घेते झाले. आणि, त्यासोबतच जवळपास कुठे पाणवठा असेल तर तिथे पाणी पिण्यासाठी येणारे एखादे सावज शिकारीसाठी मिळण्याची अंधूक शक्यताही त्या सर्वांच्या मनात जागी झाली.

आजूबाजूची झाडेझुडपे बाजूला सारून ही मंडळी जंगलाच्या आतपर्यंत गेली आणि पोहोचली ती थेट एका गुहेच्या मुखापाशी. जवळच पाण्याची झुळझुळही ऐकू येत होती. गुहेच्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या काटक्या, झुडपे, अडथळा दूर सारून सर्वजण आतल्या भागापाशी येऊन पोहोचले. आत मिट्ट काळोख होता. पुढे जावे तर नेमके एखादे श्वापद किंवा संकट दबा धरून बसले असेल याचा धोकादेखील जाणवत होता. त्यांच्यातील काही जणांनी गुहेच्या आतल्या भागात दोन-पाच मोठे दगड भिरकावून पाहिले, थोडा आरडाओरडा केला तरी आतून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मात्र काही धीट मंडळी हिमतीने पुढे सरसावली. एका हातात शस्त्र आणि दुसऱया हातात जळते पलिते घेऊन आत गेलेल्या त्या धुरंधराना अंधुकशा प्रकाशात एक शिवपिंडी व त्याला कवटाळून बसलेल्या एका भुजंगाचे दर्शन घडले. त्या बहादूरांनी प्रसंगावधान राखून भुजंगाला तिथून दूर करण्याचा प्रयत्न केला, इतक्यात कानठळ्या बसतील इतका जोरदार ध्वनी निर्माण होऊन गुहेचे द्वार बंद झाले. हे नक्कीच दैवी कृत्य असावे असे ओळखून सर्वजण शंभूमहादेवाला शरण गेले आणि ‘हे महादेवा, आमच्या हातून चूक घडली असल्यास क्षमा करावी’ अशी माफी मागू लागले. ‘आम्ही शिकारीच्या हेतूने इथे आलो होतो मात्र पुन्हा आम्ही या परिसरात शिकारीसाठी येणार नाही. आम्ही याच दिवशी दरवर्षी तुझी यथासांग पूजा करू तेव्हा तू आम्हास माफ कर आणि तुझ्या या बंधनातून मुक्त कर.’ प्रार्थना पूर्ण होते तोवर गुहेचे दार उघडले. भुजंग अदृश्य झाला. सर्वांनीच मनोभावे शिवपिंडीस वंदन केले.

अशा रीतीने डोंगराच्या कडेकपाऱयांमध्ये दडलेल्या एका देवस्थानाचा शोध लागला. त्या दिवशी मकरसंक्रांत होती म्हणून पुढे दरवर्षी या स्थानावर ग्रामस्थ दर्शनार्थ येऊ लागले आणि पाहता पाहता या स्थानाचे माहात्म्य सर्वदूर पसरले. हे स्थान ज्या गावाच्या हद्दीत येते त्या ‘मारळ’ गावाची ख्याती सर्वत्र पसरली आणि त्या मारळचा ईश्वर जो ‘श्री देव मार्लेश्वर’ आजतागायत आपले माहात्म्य राखून आहे. ‘मारळ’ गावाच्या नावाविषयी देखील एक कथा सांगितली जाते. महिमतगड किंवा मैमत गडावर परकीयांनी आक्रमण केले तेव्हा आंगवली गावातील साळुंखे-सावंत घराण्यातील कर्तबगार मंडळींनी परकीय घुसखोरांना हुसकावून लावले. त्यावेळी इथे जी हाणामारी झाली व जिथे शत्रूला कंठस्नान घालून मारलं गेलं तो परिसर म्हणजे ‘मारलं’ किंवा ‘मारळं’ आणि या परिसराचा जो अधिपती तो म्हणजेच ‘मार्लेश्वर.’

मकरसंक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वराचे हजारो भक्त त्याच्या दर्शनार्थ येथे जमतात. या यात्रा, उत्सवाच्या निमित्ताने इथला परिसर ‘हर हर मार्लेश्वर’ आणि ‘हर हर महादेव’ या जयघोषाने दुमदुमून जातो. हा संपूर्ण कथाभाग श्री. पांडुरंग शिवगण यांच्या ‘सह्याद्रीचा कैलास श्रीक्षेत्र मार्लेश्वर’ या पुस्तकामध्ये विस्ताराने मांडलेला आहे. या स्थानाच्या उत्पत्तीची कथा मौखिक रीतीने परंपरेनुसार सांगण्यात आलेली आहे.

सह्यगिरी पर्वतरांगांच्या कडेकपारीत शिखरावर वसलेले ‘श्री मार्लेश्वर’ देवस्थान संगमेश्वर तालुक्यातील देवरुखपासून आणि आंगवली गावापासून सुमारे 15 कि.मी.च्या परिघात आहे. श्री देव मार्लेश्वर हे शंभूमहादेवाचे स्वयंभू स्थान असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान म्हणून याची ख्याती आहे. गुहेतील थंडगार मधुर पाण्याची कुंडे ‘शिखर’ म्हणून ओळखली जातात. डोंगरात, कोरलेल्या गुहेच्या स्वरूपात सुरक्षित असलेल्या या मंदिराचा गाभारा आकाराने फारसा रुंद नसला तरी वेधक आहे. बाहेरचे वातावरण थंड असले तरी गाभाऱयात मात्र उबदार वातावरण असते. गाभाऱयात एका वेळी एकच व्यक्ती येऊ-जावू शकते. मंदिरामध्ये एकावेळी पन्नासेक दर्शनार्थीच थांबू शकतात. मात्र मंदिर व्यवस्थापनाचे उत्तम नियंत्रण असल्यामुळे सर्व भाविकांना सुलभ आणि सुविहितपणे श्री देव मार्लेश्वराचे दर्शन घेता येते.

‘श्री मार्लेश्वर’ स्थानाचे विशेष आकर्षण म्हणजे गाभाऱयात प्रवेश केल्यावर बारकाईने पाहिले की तिरक्या रेषेत खोलवर गेलेली काळोखी विवरे दिसून येतात. समईच्या प्रकाशात लक्षपूर्वक पाहिल्यास कातळांच्या छोटय़ा खाचेतून फटीमध्ये, भेगांमध्ये विविध प्रकारचे साप मुक्त संचार करताना दिसतात. आजवर या सर्पसृष्टीकडून कोणत्याही भाविकाला इजा झाल्याचे ऐकिवात नाही. इथे येणारा शिवभक्त निसर्गाच्या या अनोख्या आविष्काराकडे पाहून थक्क आणि अचंबित झाल्याशिवाय राहात नाही.

‘श्री मार्लेश्वर’ देवाचे स्थान आणि ही गुहा पांडवकालीन असल्याचे काही जाणकार संशोधक सांगतात. या गुहेतून सह्याद्रीच्या माथ्यावर जाण्याकरिता एक गुप्त मार्ग असून तो ‘गोठणे’ या गावी बाहेर पडतो असेही सांगण्यात येते. येथून जवळच संगमेश्वर येथे पांडवकालीन श्री कर्णेश्वर मंदिर आहे. या परिसरातील देवळाच्या खालच्या अंगाने वाहणाऱया गंगेचा उगम सह्याद्री शिखरातून सुमारे 200 फूट उंचीवरून पडणाऱया धबधब्यातून झालेला आहे. हा धबधबा ‘धारेश्वर’ या नावाने सुपरिचित आहे. श्री मार्लेश्वराचे दर्शन घेण्यास आलेले यात्रेकरू या धबधब्याखाली स्नान करून मगच दर्शनासाठी मंदिराकडे जातात. या धबधब्यापाशी नैसर्गिकरीत्या निर्माण झालेले उंच पाषाण, दगडांचे आडोसे आणि कातळघरे पर्यटकांना नेहमीच खुणावतात. मकरसंक्रांत हा यात्रेचा मुख्य दिवस असून पालखी व लग्नसोहळा उत्सव असे दोन दिवस थाटामाटात साजरे केले जातात. ‘श्री क्षेत्र मार्लेश्वर म्हणजे सह्याद्रीचा कैलास’ याची जाणीव इथे येणाऱया प्रत्येकाला होते.

(क्रमशः)

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या