मी भंकस करत नाहीये! पुतिन यांचा अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाच्या यूक्रेनसोबतच्या युद्धाला आता बराच काळ लोटला आहे. या दरम्यान रशियाचे पंतप्रधान व्लादिमीर पुतिन यांनी पुन्हा देशात सैन्याची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. पाश्चिमात्य देश हे रशियाला कमकुवत करून उद्ध्वस्त करू इच्छित आहेत. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असा आरोपही पुतिन यांनी केला आहे.

रशियन वृत्तसंस्था आरटीने यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. पाश्चिमात्य देश हे रशियाला उद्ध्वस्त करण्याचं आव्हान देत आहेत. पण आम्ही आमच्या देशाला सुरक्षित राखण्यासाठी ही पावलं उचलत आहोत. जर आमच्या अखंडतेला धोका निर्माण झाला तर रशिया सगळ्या उपलब्ध असलेल्या अस्त्र-शस्त्रांचा वापर करेल. याला भंकस अजिबात समजू नये, असा अण्वस्त्र हल्ल्याचा इशारा पुतिन यांनी दिला आहे.

पुतिन यांच्या म्हणण्यानुसार, यूक्रेनमधील लुहांस्क पिपल्स रिपब्लिक या शहराला मुक्त करण्यात आलं आहे. तसंच, डोनेत्स्क पिपल्स रिपब्लिकला देखील अंशतः मुक्त करण्यात आलं आहे, अशी माहिती पुतिन यांनी दिली आहे. डोनेत्स्क आणि लुहांस्क ही दोन शहरं लवकरच रशियात सामील होणार आहेत. शुक्रवारपासून यासाठी मतदान प्रक्रिया सुरू होईल.

डोनेत्स्क हे रशियाच्या सीमेलगत असणारं शहर असून त्याची ओळख एकेकाळी यूक्रेनचं सगळ्यात मोठं औद्योगिक क्षेत्र अशी होती. हे डोनबास राज्याचं मुख्य शहर आहे. या शहरात काही मौल्यवान खनिजं आढळतात. तसंच, यूक्रेनच्या सर्वात मोठ्या स्टील उत्पादक केंद्रांपैकी एक म्हणूनही हे ओळखलं जातं. तर लुहांस्क हे शहर आधी वोरोशिलोवग्राद या नावाने ओळखलं जात होतं. हे यूक्रेनचं कोळसा भांडार म्हणून ओळखलं जातं.