आता व्यवसाय शिक्षण शिक्षकही आंदोलनावर; 9 मार्चला आझाद मैदानात धरणे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

 

राज्यातील व्यवसाय शिक्षण शिक्षकांनीही आता आंदोलनाची हाक दिली असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे शिक्षक 9 मार्चपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहेत. राज्य सरकारने यापूर्वी मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र दिलेला शब्द न पाळल्याने शिक्षकांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

व्होकेशनल टीचर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी शालेय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात यावेत व नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगत बदल करण्यात यावेत. विनाअनुदानित काळातील शिक्षकांची सेवा वरिष्ठ / निवडश्रेणीसाठी ग्राह्य धरण्यात यावी. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील रिक्त पदे भरण्यास तत्काळ परवानगी देण्यात यावी. 42 दिवसांच्या संपकालीन रजा शिक्षकांच्या खात्यात जमा करण्यासंबंधी कार्यवाही तत्काळ करावी. तासिका तत्त्वावरील शिक्षकांचे मानधन रुपये 500 प्रति तास तत्काळ करण्यात यावे. भाषा विषय शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मिळण्याबाबत सर्व अडचणी दूर करण्यात याव्यात. सर्वच कर्मचाऱयांना निवडश्रेणी सरसकट द्यावी. जुनी पेन्शन योजना सर्वांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी या व अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

असोसिएशनच्या वतीने 28 डिसेंबरला आंदोलन करण्यात आले होते. मात्र त्या वेळी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांच्या विनंतीनुसार आंदोलन स्थगित केले होते. मात्र अद्यापही त्याबाबत शिक्षकांना न्याय न मिळाल्याने पुन्हा तीव्र आंदोलन करण्याशिवाय आम्हाला दुसरा मार्ग नाही, असे असोसिएशनचे अध्यक्ष जयंत भाभे यांनी सांगितले.