2014 ला दान म्हणून मत दिले आता 2019 ला काम पाहून मत द्या – खा.सदाशिव लोखंडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोपरगाव

केंद्राच्या निवास, शौचालये, लाईट देणे अशा या सर्व योजना गावागावात राबविल्या, त्याचबरोबर निळवंडे धरण कालव्यासाठी जल दिंडी काढून 22 शे कोटीचा निओ दिले आहे. याची शहानिशा करा. होय एक चूक झालीच, मला या कामांचे मार्केटिंग करता आले नाही. याचा अर्थ मी काम केले असा होत नाही. एका उमेदवाराचे पोलीस ऐकत नाही, तर दुसऱ्याने तुपाचे पैसे खाल्ले, अशांना तुम्ही खासदार करणार का? असा सवाल करून 2014 ला म्हणून दान म्हणून मत दिले आता 2019 ला काम पाहून मत द्या, असे आवाहन खासदार सदाशिव लोखंडे यांनी मंगळवारी 16 रोजी कोपरगाव येथील एका कार्यकर्ता मेळाव्यात केले. अध्यक्षस्थानी आमदार स्नेहलता कोल्हे या होत्या.

यावेळी बोलताना साई संस्थान विश्वस्त बिपीन कोल्हे म्हणाले, आजच्या जमान्यात दुसऱ्याने केलेल्या कामाच्या सेल्फी काढून श्रेय घेण्याचे प्रकार सर्रास घडत असताना खासदार लोखंडे यांना मात्र पाच वर्षात केलेल्या कामाचा गवगवा त्यांना करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. काम कमी झाले तरी चालेल पण आपल्याला प्रामाणिक खासदार हवा. येणाऱ्या 29 तारखेला आपल्याला व मतदारांना अर्जुनाच्या हातातील धनुष्य बाण दिसला पाहिजे, असे सांगून उपस्थितांकडून तीन वेळेस धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण असे हात वर करून वदवून घेतले. यावेळी आमदार दराडे म्हणाले, या मतदारसंघाचे संपर्कप्रमुख मी मला भाग्यवान समजतो आघाडी आघाडी सरकारने पंधरा वर्ष सत्ता भोगून जे त्यांना करता आले नाही ते युतीच्या सरकारने केवळ साडेचार वर्षात करून दाखविले लोकसभा ही सेमीफायनल असून विधानसभा ही फायनल आहे मी शेजार धर्म पाळणारा माणूस आहे. असेही त्यांनी सांगितले.

आमदार स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, देशाला मजबूर नव्हे, तर मजबूत पंतप्रधान हवा, आरोप किती,आणि काहीही होवोत, 125 कोटी जनता हाच मोदींचा परिवार आहे. मोदींना मत म्हणजे देशभक्तीला मत राजकारण हे वैचारिक युद्धभूमी असून आपण सैनिक म्हणून काम करायचे आहे. 2014 मध्ये लाट मोदीची होती तर आता 2019 ला देशाला आज गरज मोदीची आहे. असेही त्यांनी सांगितले.

यावेळी केशव भवर, रवींद्र बोरावके, मच्छिंद्र टेके, करीम कुरेशी, दिपक गायकवाड, दिलीप दारुणकर, डॉ. चेतन लोखंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे, भाजपा तालुका अध्यक्ष शरद नाना थोरात, संजीवनी कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन, दत्तू नाना कोल्हे, भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते संजीवनी कारखान्याचे संचालक आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव मेळाव्यात हजर होते. सूत्रसंचालन विश्वास महाले यांनी केले. शेवटी आभार भाजपा शहराध्यक्ष कैलास खैरे यांनी मानले.

आमदार दराडे म्हणाले, विधानसभेला चिन्हाबाबत काही अडचण आली. तर मी उद्धव साहेबांकडे रदबदली करून शेजारधर्म पाळीन. यावर आमदार म्हणाल्या, मुख्यमंत्री बीजेपीच्या आमदारांना कुठेही जाऊ देणार नाहीत. चिन्हाचे काय? आपली युती आहे. हे लक्षात राहू द्या, असे त्यांनी म्हटल्यावर एकच हशा पिकला….