बोगस नावे वगळण्यासाठी मतदार यादीचे ग्रामसभेत वाचन करा; मुरबाड तहसीलदारांचे पंचायत समितीला आदेश

प्रातिनिधिक फोटो

मुरबाड विधानसभा क्षेत्रातील मतदार याद्यांमध्ये असलेले २५ हजार बोगस मतदार कमी करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. ही नावे ऑन दी स्पॉट वगळण्याकरिता मतदार यादीचे ग्रामसभेत वाचन करा, असे आदेश मुरबाडचे तहसीलदार यांनी पंचायत समितीला दिले आहेत. तहसीलदारांनी दिलेल्या या आदेशामुळे बोगस नावे घुसवणाऱ्यांची आता चांगलीच पळापळ उडाली आहे.

मुरबाड तालुक्यातील मतदार यादीत असलेले २५ हजार बोगस व दुबार नावे वगळावीत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते शरद पवार यांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांना अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर या मागणीच्या अनुषंगाने मतदार यादीत सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. २९ ऑक्टोबर २०२४मध्ये अस्तित्वात असलेली मतदार यादी ग्रामसभेत तपासणीसाठी ठेवण्यात यावी आणि तिचे वाचन करण्यात यावे. ग्रामसभेत नागरिकांनी आपल्या नावांची व इतरांची नोंद तपासावी, असे निर्देश तहसीलदार अभिजित | देशमुख यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दहा दिवस अगोदर सूचना द्या
मृत मतदारांची यादी तयार करून त्यांचे मृत्यू दाखले केंद्रस्तरीय अधिकारी व बीएलओ यांना देण्यात यावेत. तसेच कायमस्वरूपी स्थलांतरित, संदिग्ध आणि दुबार नोंदी असलेल्या मतदारांची यादी वेगळी तयार करून सादर करावी. ग्रामसभेबाबतची माहिती गावपातळीवर किमान दहा दिवस आधी सर्व नागरिकांना कळविण्यात यावी. ग्रामसभेला जास्तीत जास्त ग्रामस्थ उपस्थित राहतील याची काळजी घेण्यात यावी, नावे कमी करताना कोणावर अन्याय होणार नाही, याचीही दक्षता घ्यावी, अशाही सूचना तहसीलदारांनी प्रशासनाला दिल्या आहेत.