केंद्रप्रमुखांच्या स्टेट्सवर राजकीय पक्षाचे चिन्ह, आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

मतदानाच्या दिवशी केंद्रप्रमुख म्हणून काम करत असताना व्हॉट्सअपच्या स्टेटसवर राजकीय पक्षाचे चिन्ह ठेवल्यामुळे केंप्रमुखाच्या विरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात केंद्रप्रमुखाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात बुद्धिवंत दत्तू रड कनिष्ठ अभियंता चाकूर उपविभाग यांनी तक्रार दाखल केली. लोकसभा निवडणूकीच्या भरारी पथकात ते काम करीत होते. मतदानाच्या दिवशी कवठाळी येथील केंद्रप्रमुख म्हणून काम करणारे उत्तम मुरलीधर करसुळे यांनी त्यांच्या व्हॉट्सअपवर स्टेटस म्हणून राजकीय पक्षाचे चिन्ह ठेवलेले होते. सीव्हीजल अ‍ॅपवर या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली होती. त्यामुळे त्याच दिवशी केंद्रप्रमुखाचा मोबाईल तपासणी केला असता त्यावर व्हॉट्सअपच नव्हते. तसा पंचनामा करुन अहवालही उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्याकडे पाठवण्यात आलेला होता. मात्र तपासणीच्या काही वेळ आधी करसुळे यांनी त्यांच्या मोबाईमधील व्हॉट्सअॅप अनइंस्टॉल केले होते. मात्र नंतर अधिक तपासणीअंती त्यांनी व्हॉट्सअॅपचा डिपी व स्टेटृसवर राजकीय पक्षाचे चिन्ह ठेवले होते असे स्पष्ट झाले.त्यामुळे केंद्रप्रमुख उत्तम मुरलीधर करसुळे यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.