
नगर जिल्ह्यात गेल्या 20-25 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी जोरात सुरू आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दि 21 नंतर अर्ज माघारीची मुदत संपल्यावर निवडुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून नेत्यांच्या प्रतिष्ठा लागली आहे. एकूण 14 बाजार समित्यांच्या निवडणूका दोन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यातील 7 बाजार समित्यांसाठी उद्या मतदान होणार असून त्यामध्ये नगर, राहुरी, संगमनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, पारनेर, कर्जत तालुक्यांचा समावेश आहे. राहुरी बाजार समितीची सायंकाळी तर बाकीच्या 6 बाजार समित्यांची उद्या शनिवारी मतमोजणी होणार आहे. उर्वरित 7 बाजार समित्यांसाठी रविवारी मतदान होणार असून त्याच दिवशी सायंकाळी मतमोजणी होणार आहे.
बाजार समिती निवडणुकीनंर नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हापरिषद निवडणूक असल्यामुळे सर्वच नेतेमंडळी कामाला लागली असून प्रचारात आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप तर काही ठिकाणी भाजप, काँग्रेस, मनसे अशी अशक्य वाटणारी युतीही झाली आहे. ग्रामीण भागाच्या अर्थकारणात बाजार समित्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे या समित्या ताब्यात घेण्यासाठी राजकीय नेत्यांनी जोर लावला असून जवळच्या कार्यकर्त्यांना निवडून आणून समितीची सत्तासूत्रे आपल्याच हातात राहतील यासाठी कंबर कसली आहे.
राहुरी बाजार समितीत यंदा माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले व विखे यांच्या पॅनेलमध्ये लढत होणार आहे. कर्डिलेंना विखे गटाचीही साथ मिळाल्याने त्यांचे बळ वाढले आहे. त्यामुळे येथील लढत रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. नगर बाजार समितीत शिवाजी कर्डिलेंविरोधात तनपुरे हे प्रचार करत आहेत. तर कर्डिले हे विखेंच्या मदतीने राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती कशा पद्धतीने ताब्यात घेता येईल, यासाठी राजकीय डावपेच टाकत आहेत. दोघांसाठीही ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे.येथे 18 जागांसाठी 3 अपक्षासह 39 जण आपले नशीब अजमावत आहेत.
नगर बाजार समितीत कर्डिले गटाला बाहेर काढण्यासाठी येथील स्थानिक नेत्यांच्या महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. या निवडणुकीत तर कर्डिले यांचे पुतणे रोहिदास कर्डिलेच त्यांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, प्रा. शशिकांत गाडे, शरद झोडगे यांनीही बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत. विरोधक एकवटले असले तरी कर्डिलेंना मिळत असलेली विखेंची साथ ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली आहे. काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता विखेंनी त्यांचा विरोध मवाळ केल्याचे दिसत आहे. येथे कर्डीले गटाचे दोघे बिनविरोध निवडून आले असून 16 जागांसाठी 35 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील दक्षिण भागातील बाजार समित्यांत फक्त भाजपला रोखण्याच्या उद्देशाने अशक्य वाटतील अशी हातमिळवणी झाली आहे. पारनेरमध्ये माजी आमदार विजय औटी आणि आमदार निलेश लंके यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. तरी देखील खासदार विखे यांना शह देण्यासाठी हे दोघे जुना वाद विसरून एकत्र आले आहेत. समितीतील 18 जागांची तीन पक्षात वाटणी करत त्यांनी पॅनल तयार केले आहे. येथे भाजपचेही पॅनल असून माजी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरेंची विखेंना साथ मिळत आहे.
पाथर्डी बाजार समितीतही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रताप ढाकणे आणि भाजप आमदार मोनिका राजळे यांच्यात लढत होत आहे. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने विधानसभा निवडणुकीतील पराभवाची काही प्रमाणात का होईना परतफेड करण्याची संधी ढाकणे यांना मिळाली आहे. ढाकणे यांनी यावेळी येथे जुन्या संचालकांना डच्चू देत सर्वच जागांवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आता त्यांची ही खेळी कितपत यशस्वी ठरते हे निवडणुकीच्या निकालानंतरच समोर येईल. पंधरा संचालकांना त्यांनी घरचा रस्ता दाखवला आहे. त्यांच्या या डावपेचाची जोरदार चर्चा सुरू आहे.येथे 18 जागांसाठी 37 जण रिंगणात आहेत.
कर्जत-बाजार समितीची निवडणूक जिल्ह्यातच नाही तर राज्यभरात चर्चेत आहे. आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांना धक्का देत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष काकासाहेब तापकीर यांना भाजपच्या पॅनलमधून उमेदवारी दिली आहे. या प्रकाराची दखल घेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी तापकीर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कर्जत समितीची निवडणूक तिरंगी होईल असे वाटत होते. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे समर्थक अंबादास पिसाळ यांची नाराजी दूर करण्यात शिंदेंना यश आले. त्यामुळे पिसाळ यांची तिसरी आघाडी प्रत्यक्षात न येता त्यांना शिंदे यांच्यासोबत जावे लागले. याआधी नगरपंचायतीच्या निवडणुकीत काही जागा बिनविरोध करत रोहित पवार यांनी शिंदे यांना धक्का दिला होता. या निवडणुकीत त्याची परतफेड करत शिंदे यांनी पवारांना धक्का दिला आहे येथे 18 जागांसाठीजागांसाठी 45 उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत.
श्रीगोंदा बाजार समिती मध्ये रंगतदार लढत असून येथे निवडणुकीपूर्वीच आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडल्याने ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. येथे नागवडे-पाचपुते विरुद्ध माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटात लढत होत असून ही विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम ठरण्याची शक्यता आहे. येथे 18 जागांसाठी 48 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
संगमनेर बाजार समितीमध्ये प्रथमच आजी माजी महसूल मंत्रांचे पॅनल आमने सामने असून विखे यांनी प्रथमच या निवडणुकीत थोरातांपुढे आव्हान उभे केले आहे. येथे 18 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुच्या रिंगणात आहेत. सर्वच बाजार समितीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घातल्याने ह्या निवडणूका अटीतटीच्या होण्याची शक्यता आहे.






























































