बेस्ट कामगारांच्या पतपेढी निवडणुकीसाठी आज मतदान; उद्या मतमोजणी; शिवसेना-मनसे युतीच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलचा बोलबाला

बेस्ट उपक्रमातील कामगारांच्या ‘दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑप. व्रेडिट सोसायटी’ची पंचवार्षिक निवडणूक सोमवारी होणार आहे. पुलाब्यापासून पश्चिम उपनगरात गोराईपर्यंत, तर पूर्व उपनगरात मुलुंडपर्यंत 27 ठिकाणी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे. तसेच मंगळवारी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीत शिवसेना-मनसे युतीच्या ‘उत्कर्ष’ पॅनेलचा बोलबाला दिसून येत आहे.

‘बेस्ट’ उपक्रमातील कामगारांच्या पतपेढीवर अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या बेस्ट कामगार सेनेचा दबदबा राहिला आहे. यंदा बेस्ट कामगार सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण बेस्ट कामगार कर्मचारी सेना प्रणित ‘उत्कर्ष पॅनेल निवडणूक रिंगणात उतरले आहे. त्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले आहेत. निवडणूक प्रचारात ‘उत्कर्ष’ पॅनेलचा बोलबाला दिसून आल्याने सोमवारी होणाऱ्या मतदान प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभण्याची आशा आहे. पुलाब्यातील प्रशासकीय कार्यालयासह बेस्ट बस आगारांमध्ये मतदान केंद्रे कार्यान्वित राहणार आहेत. त्यानंतर मंगळवारी बेस्टच्या वडाळा आगारात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. संचालक मंडळाच्या या निवडणुकीत ‘उत्कर्ष’ पॅनेलचा विजय निश्चित असून आमच्या प्रदीर्घ सेवेचे मोल म्हणून कामगार आम्हालाच पसंती देतील, असा विश्वास बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी व्यक्त केला.