व्हीलचेअरवरून मतदान, 85 वयातही उत्साह; प्रत्येक मत मोलाचं सुमित्रा भिंगार्डे यांनी दिला संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकशाही ही केवळ शासन आणि निवडणूक आयोगाच्या व्यवस्थेवर अवलंबून नसून ती समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातूनच जिवंत राहते, याचे हृदयस्पर्शी चित्र आज संगमेश्वर तालुक्यातील रामपेठ मतदान केंद्रावर पाहायला मिळाले. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानादरम्यान संगमेश्वर रामपेठ येथील रहिवासी असलेल्या 85 वर्षीय सुमित्रा पांडुरंग भिंगार्डे यांनी व्हीलचेअरच्या सहाय्याने मतदान करत आपला हक्क बजावला.

या संपूर्ण प्रक्रियेत नातेवाईक आणि स्थानिक तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली. चालण्यास असमर्थ असल्याने भिंगार्डे यांना घरातून बाहेर पडणेही कठीण होते. मात्र नातेवाईकांनी पुढाकार घेत तरुणांच्या मदतीने त्यांना व्हीलचेअरवरून घरातून मतदान केंद्रापर्यंत आणले. रस्त्यात कुठेही अडथळा येऊ नये याची काळजी घेत त्यांना सुरक्षितपणे मतदान केंद्रात नेण्यात आले. मतदानानंतर त्याच पद्धतीने त्यांना सन्मानपूर्वक घरी परत सोडण्यात आले.

या सहकार्यामुळे “मतदान हा प्रत्येकाचा हक्क आणि जबाबदारी आहे” हा संदेश कृतीतून अधोरेखित झाला. आज अनेक ठिकाणी तरुण मतदानापासून दूर राहतात, मात्र येथे तरुणांनी पुढाकार घेत ज्येष्ठ नागरिकाचा मतदानाचा हक्क जपल्याने सामाजिक ऐक्याचे दर्शन घडले. शासन व निवडणूक आयोगाने उपलब्ध करून दिलेल्या सुविधांबरोबरच समाजातील संवेदनशीलता आणि सहभागही लोकशाहीसाठी तितकाच महत्त्वाचा असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले. निवडणूक कर्मचाऱ्यांनीही भिंगार्डे यांना आवश्यक ती मदत करत संवेदनशीलता दाखवली. व्हीलचेअरवरून मतदान करण्याची ही घटना लोकशाही आणि सामाजिक जबाबदारी यांचा संगम ठरली आहे.

“वय जरी वाढले तरी मतदानाचा हक्क थांबत नाही. प्रत्येक मत आपल्या देशासाठी महत्त्वाचं आहे. आज माझ्या नातेवाईक आणि तरुणांच्या मदतीने मी माझा हक्क बजावला, आणि यामुळे मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो. मी सगळ्यांनाही सांगते आपल्या मताचा उपयोग करा, कारण प्रत्येक मत आपल्या लोकशाहीची शक्ती वाढवतं. ”
सुमित्रा भिंगार्डे ज्येष्ठ नागरीक, रामपेठ संगमेश्वर