प्रचाराच्या तोफा थंडावल्या; गोवा, उत्तराखंडात उद्या मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या गोवा, उत्तराखंड विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या. सोमवारी (दि. 14) गोवा, उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशातील दुसऱया टप्प्याचेही यावेळी मतदान होईल.

गोव्यात 40 मतदारसंघांत बहुरंगी लढत पाहायला मिळत आहे. भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस  हे पक्ष निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शिवसेना नेते, पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रचार सभांना प्रचंड गर्दी उसळली होती.   शिवसेनेचा येथे झंझावाती प्रचार पाहायला मिळाला. शिवसेना गोव्यात 11 जागा लढवत आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर हे पणजीतून अपक्ष लढत आहेत. त्यांना शिवसेनेचा पाठिंबा आहे. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती आहे. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह डझनभर केंद्रीय मंत्री यांनी प्रचार केला. महाराष्ट्र विधनासभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस येथे भाजपचे प्रभारी आहेत. काँग्रेस उमेदवारांसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी, पी. चिदंबरम आदींनी प्रचार केला. यावेळी तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षानेही उमेदवार उभे केलेत.

उत्तराखंडमध्ये काय होणार

उत्तराखंड विधानसभेच्या 70 जागांसाठी सोमवारी मतदान होत आहे. पाच वर्षांत तीनवेळा भाजपने येथे मुख्यमंत्री बदलले आहेत. भाजप आणि काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. ‘आप’नेही सर्व मतदारसंघात उमेदवार दिले आहेत.

उत्तर प्रदेशात लक्ष

उत्तर प्रदेशात दुसऱया टप्प्यातील 55 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होणार आहे. भाजप, सपा, काँग्रेस या सर्वच प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक नेते, मंत्र्यांनी भाजपचा प्रचार केला. सपाच्या प्रचाराची धुरा अखिलेश यादव यांच्या खांद्यावर आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी-वढेरा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विविध काँग्रेस नेत्यांनी प्रचार केला. उत्तरप्रदेशात सात टप्प्यात मतदान होत आहे.

निवडणूक आयोगाची पदयात्रा, सभांना परवानगी

गोवा, उत्तराखंड येथे प्रचार संपल्यानंतर निवडणूक आयोगाने कोरोनामुळे प्रचारावर घातलेले निर्बंध शिथिल केले आहेत. उमेदवारांना प्रचाराची वेळ वाढवून दिली आहे. आता सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत प्रचार करता येईल. पदयात्रांना कोरोना नियमांचे पालन करून परवानगी दिली आहे. मैदान क्षमतेच्या 50 टक्के लोकांच्या उपस्थितीत प्रचार सभा घेता येतील. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने निर्बंध शिथिल केल्याचे आयोगाने सांगितले.

 उत्तर प्रदेशात सोमवारी दुसरा टप्पा

उत्तर प्रदेशात दुसऱया टप्प्यातील 55 मतदारसंघांमध्ये सोमवारी मतदान होणार आहे. सहारनपूर, बिजनौर, अमरोहा, संभल, मुरादाबाद, रामपूर, बरेली, बदायू आणि शहाजहानपूर या नऊ जिह्यांतील हे मतदारसंघ आहेत.