
प्रबोधन गोरेगाव आणि फन लीडर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वर्ष 11 वी ‘महाराष्ट्राचा महावक्ता-2026’ राज्यस्तरीय खुली वत्तृत्व स्पर्धा 14 व 15 फेब्रुवारीला गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधन क्रीडाभवन येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या स्पर्धेत प्रथम पारितोषिक परभणी येथील काझी हुसेमा मो. नजमोद्दीन यांनी पटकावले. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि 21 हजार रुपये रोख असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. द्वितीय पारितोषिक कार्तिक दराडे (उदगीर) तर तृतीय पारितोषिक लक्ष्मण कचरे (महाड) यांनी पटकावले.
शिवसेना नेते, प्रबोधन गोरेगावचे संस्थापक सुभाष देसाई यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. राज्यभरातून आलेल्या शंभरपेक्षा अधिक स्पर्धकांनी सामाजिक, राजकीय, भाषिक आणि मानवी मूल्यांवर आधारित विषयांवर प्रभावी मांडणी करत श्रोत्यांची दाद मिळवली. ‘माझं पक्षावर एकतर्फी प्रेम आहे…!’, ‘भाषेचं राजकारण-सक्तीचं की शक्तीचं?’, ‘अशा दीड दमडीच्या पायी, माझा समाज विकणार नाही.’, ‘प्रश्न टांगले आभाळाला उत्तर मातीवरती’, ‘ब्रेकअपनंतर गाण्यांचा अर्थ लागतो!’, ‘माणूस जिवंत आहे, माणुसकी आयसीयूमध्ये…’, ‘लोकशाही चालते मतांवर, पण टिकते प्रश्नांवर.’ यांसारख्या विचारप्रवर्तक विषयांमुळे स्पर्धेला विशेष रंग चढला. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण शिंदे आणि बबन सरवदे यांनी केले.
विशेष लक्षवेधी गटात प्रथम क्रमांक संचिता आष्टेकर (नांदेड), द्वितीय क्रमांक स्मित मोकल (पनवेल) आणि तृतीय क्रमांक रत्नेश्वरी बन (ठाणे) यांनी पटकावला. पाच विशेष उत्तेजनार्थ पुरस्कार अथर्वी चव्हाण (रत्नागिरी), अवनी गायकवाड (कल्याण), वज्रेश्वरी बन (ठाणे), ध्रुव सोनवणे (पुणे) आणि जान्हवी हातमोडे (पनवेल) यांना प्रदान करण्यात आले. नवोदित गटासाठी विशेष पारितोषिके कौस्तुभ गोसावी (ठाणे) व आर्या जोजे (पेण) यांना देण्यात आली






















































