जगातील पहिल्या वृक्ष संमेलनात रंगणार अनोखी वृक्ष सुंदरी स्पर्धा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून पालवनच्या उजाळ माळरानावर फुललेल्या सह्याद्री देवराई प्रकल्पावर जगातील पहिले वृक्ष संमेलन 13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी होत आहे. या संम्मेलनात विश्व सुंदरीच्या धरतीवर वृक्ष सुंदरी स्पर्धा रंगणार आहे. झाडांवर प्रेम करणार्‍या आणि झाडांविषयी सखोल ज्ञान असलेल्या सुंदरींच्या या अनोख्या स्पर्धेची सार्‍या महाराष्ट्राला उत्सुकता आहे.

सह्याद्री देवराई व वनविभाग बीड यांच्या संयुक्त विद्यमाने पालवनच्या माळरानावर झाडांचा मळा फुलवण्यात आला आहे. या ठिकाणी लाखो झाडे लावण्यात आली असून भविष्यात जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट प्रेक्षणीय स्थळ बनेल. या पध्दतीने सह्याद्री देवराई प्रकल्पाचा विकास सिनेअभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, कृषीभूषण शिवराम घोडके आणि वन विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. याच सह्याद्री देवराई प्रकल्पावर 13 व 14 फेब्रुवारी 2020 रोजी जगातील पहिले वृक्ष संमेलन होणार आहे. 12 फेब्रुवारी रोजी बीड शहरात भव्य अशी वृक्ष दिंडी काढण्यात येणार असून झाडांच्या रोपांची पालखीतून मिरवणूक काढण्यात येणार आहे. 13 व 14 फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील  महाविद्यालयीन तरूणींची वृक्ष सुंदरी ही स्पर्धा रंगणार असून जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील 100 तरूणी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यातून दोन तीन स्पर्धात्मक फेर्‍यातून अंतिम तीन वृक्ष संदुरींची निवड करण्यात येणार आहे.

अशी होणार वृक्ष सुंदरी स्पर्धा
जिल्हाभरातील महाविद्यालयातून 100 तरूणी या संमेलनात सहभागी होणार आहेत. केवळ सौंदर्य नव्हे तर निसर्गाकडे पाहण्याची दृष्टी, निसर्ग आणि झाडे, वेली, पशू, पक्षी या विषयीचे ज्ञान अधिक असलेल्या तरूणींना तीन फेर्‍यांमधून स्पर्धेला समोरे जावे लागणार आहे. अंतीम ज्या तीन सुंदरींची निवड होईल त्यांना अनोखे पोरितोषिक म्हणून राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प ताडोबा व पेंच या जंगलाची पर्यटन ट्रीप घडवण्यात येणार आहे. प्राचार्या सविता शेटे व मेघना बडजाते यांच्या मार्गदर्शनाखाली ही वृक्ष सुंदरी स्पर्धा होणार आहे.