पदार्पणापासूनच त्याचा धावसंख्या उभारण्याचा ध्यास; दिग्गज क्रिकेटपटूने केले विराटचे कौतुक

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये 12 हजाराची धावसंख्या पूर्ण केली आहे. त्याच्या या खेळीचे माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी कौतुक केले आहे. विराटने ज्या तडफेने 2008 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तीच तडफ आजही त्यांच्यात कायम आहे. त्याच क्षमतेने तो आजही खेळत असल्याचे लक्ष्मण यांनी म्हटले आहे.

एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये सर्वाधिक वेगाने 12 हजाराची धावसंख्या त्याने पूर्ण केली आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात बुधवारी झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय समान्यात विराटने ही धावसंख्या पूर्ण केली आहे. विराटने 251 एकदिवसीय सामन्यांमध्ये 242 डावांमध्ये फलंदाजी करत ही धावसंख्या उभारली आहे. तर सचिनने ही धावसंख्या उभारण्यासाठी विराटपेक्षा 58 डाव जास्त खेळले होते.

विराट ज्या तडफेने प्रत्येक सिरीजमध्ये खेळत आहे. तसेच ज्या वेगाने प्रत्येक सामन्यात धावसंख्या उभारत आहे, ते सर्व अविश्वसनीय वाटते, असे लक्ष्मण यांनी एका शोदरम्यान सांगितले. एखाद्या सामन्यात विराटसमोर आव्हाने असतील आणि त्या वेळी त्याच्या खेळाची आणि धावसंख्येची गती मंदावेल असे वाटते. मात्र, कोणत्याही सामन्यात विराटची खेळण्याची तडफ आणि धावसंख्येची गती कमी झालेली दिसत नाही, असेही ते म्हणाले. क्रिकेटच्या मैदानात उतरल्यानंतर फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करताना विराटमध्ये उर्जा आणि उत्साह असतो, असेही त्यांनी सांगितले.

विराटने 86 कसोटी सामन्यात 7240 तर 82 टी-20 समान्यात 2794 धावा केल्या आहेत. तर आतापर्यंत 70 शतके केली आहेत. त्यात 27 कसोटी तर 43 एकदिवसीय सामन्यात केली आहेत. संघावर दबाव असताना सर्वोत्तम खेळी करण्याचे कसब विराटकडे असल्याचेही लक्ष्मण यांनी सांगितले. एकदिवसीय सामन्यात धावसंख्या उभारताना विराटने वेगवान शतके केली आहेत. धावफलक हलता ठेवण्याचे आव्हान आणि दबाव विराटवर नेहमी असतो. ते आव्हान स्वीकारत तो स्वतःची जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडत असल्याचेही लक्ष्मण यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या