वाडाने हिंदुस्थान डोप टेस्ट लॅबवरील निलंबन वाढवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक ऍण्टी डोपिंग एजन्सीकडून (वाडा) गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हिंदुस्थानच्या राष्ट्रीय डोप टेस्ट लॅबोरेटरीवर (नाडा) सहा महिन्यांच्या निलंबनाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यामुळे हिंदुस्थानच्या टोकियो ऑलिम्पिकच्या मोहिमेला धक्का पोहोचला होता. टोकियो ऑलिम्पिक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. आता वाडाकडून नाडाला दिलासा मिळेल असे वाटत असतानाच वाडाकडून 17 जुलैपासून नाडावरील निलंबन पुन्हा एकदा सहा महिन्यांनी वाढवण्यात आले आहे. त्यामुळे हिंदुस्थानचा पाय खोलातच राहिला आहे.

वाडाकडून लॅबची पाहणी करण्यात आल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, ही लॅब आंतरराष्ट्रीय दर्जाची नव्हती. खेळाडूंची सॅम्पल घेण्याची पद्धतही योग्य नव्हती. त्यामुळे नाडाला निलंबनाच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. आता नाडा याविरोधात क्रीडा लवादाकडे 21 दिवसांच्या आत अपील करू शकते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू म्हणाले की, नाडाच्या प्रकरणावर दृष्टिक्षेप टाकल्यानंतर प्रचंड नाराज झालो. नाडाकडून व्यावसायिकपणा जपण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते, परिस्थिती कशी नियंत्रणात येईल हेही पाहणे गरजेचे होते, असेही ते पुढे म्हणाले.