
वडाळा रेल्वे स्थानक येथे प्रवाशांना वर्षानूवर्षे भेडसावणारे प्रश्न शिवसेनेच्या माध्यमातून लवकरच मार्गी लागणार आहेत. शिवसेना नेते, खासदार अनिल देसाई यांनी वडाळा स्थानकात भेट देवून प्रवाशांच्या अडचणी जाणून घेतल्या तसेच प्रवाशांच्या समस्येबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
अनिल देसाई यांनी स्थानकात भेट देऊन तेथील प्रवाशांच्या होणाऱ्यां गैरसोईबद्दल माहिती घेतली. त्यावेळी प्रवाशांनी अनेक समस्या त्यांच्या पुढे मांडल्या. दिव्यांगांसाठी रॅम्पची सुविधा नसणे, प्रवाशांना माहिती देणारे इंडिकेटर दक्षिण दिशेस नसणे, अरुंद फलाट, फेरीवाल्यांचा उपद्रव अशा अनेक तक्रारी प्रवाशांनी केल्या. दिव्यांगांसाठी तातडीने रॅम्पची सोय करणे, वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रवेश दाराचे रुंदीकरण करणे, इंडिकेटर बसविणे, रुग्णवाहिकेची कायमस्वरुपी व्यवस्था करणे, फेरीवाल्यांवर कारवाई करणे अशा सूचना अनिल देसाई यांनी प्रशासनाला केल्या. या प्रसंगी शिवसेना नगरसेविका माधुरी मांजरेकर, राकेश देशमुख, सुनिता आयरे, रवी घोले, संदीप कांबळे, विशाखा जाधव, राजेश कुचिक, शिरीष तटकर, धनश्री पवार आदी उपस्थित होते.
पोलीस ठाण्याचे स्थलांतर करा
खासदार अनिल देसाई यांनी वडाळा रेल्वे पोलीस ठाण्याला भेट दिली असता तेथील पोलीस अत्यंत कमी जागेत काम करत असल्याचे व रेल्वेच्या हॉर्न मुळे त्यांच्या आरोग्यावर परीणाम होत असल्याचे दिसून आले त्यामुळे खासदार देसाई यांनी पोलीस ठाण्याचे स्थलांतर करण्याबाबत चर्चा केली यावेळी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक सौरभ शेटे व इतर कर्मचारी उपस्थित होते.



























































