
‘आम्ही सीआयडी पोलीस आहोत. या ठिकाणी एकनाथ शिंदे नावाचा आरोपी आहे, त्याला तुम्ही ओळखता का?’ असे म्हणून वडीगोद्री येथील वृद्ध उत्तमराव देवा जाधव यांच्या हातातील अंगठी चार तोतया सीआयडी अधिकाऱ्यांनी लांबवली. वडीगोद्री येथे हा धक्कादायक प्रकार घडला.
उत्तमराव जाधव यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, शनिवार २० सप्टेंबर दुपारी १२.२७ वाजता ते गायत्री इंग्लिश स्कूलसमोरून धुळे- सोलापूर महामार्गावरील सर्व्हिस रोडवर स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर घराकडून येत होते. मोटरसायकलवर आलेल्या चार अज्ञात चोरट्यांनी आम्ही सीआयडी पोलीस आहेत. या ठिकाणी एकनाथ शिंदे नावाचा आरोपी आहे, त्याला तुम्ही ओळखता का? त्यांचे घर कुठे आहे, असे विचारले.
मी अशा नावाच्या व्यक्तीला ओळखत नाही, मला त्यांचे घर माहीत नाही, असे उत्तमराव जाधव यांनी सांगितले. त्यातील एकाने उत्तमरावला विचारले, तुम्ही सोने कशाला वापरता ते काढा. असे म्हटल्यावर पाच ग्रॅमची अंगठी काढून शर्टच्या वरच्या खिशात ठेवली. त्यातील एकाने मला ओळखपत्र (आय कार्ड) दाखवल्यासारखे केले. शर्टच्या खिशात ठेवलेली अंगठी त्यांनी काढून घेतली.
अंगठी कागदाच्या पुडीत बांधून देतो, म्हणून अंगठी घेतली व दुसरीच कागदाची पुडी त्यांना देऊन ते चार अज्ञात मोटरसायकलवरून निघून गेले. त्यांनी दिलेली कागदाची पुडी उघडून पाहिली असता त्यामध्ये दुसरी खोटी अंगठी निघाली. ते बघितल्यावर फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच त्यांनी मुलगा सचिन जाधव याला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर व सहकारी करत आहेत.