
सामना प्रतिनिधी । नवी मुंबई
माथाडी मंडळ आणि युनियन यांच्या कृपाशीर्वादाने गोरगरीब माथाडी कामगारांच्या तुटपुंज्या मिळकतीवर डल्ला मारला जात असल्याचा प्रकार एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये उघडकीस आला. भाजीपाला मार्केटच्या लिलावगृहात काम करणाऱ्या 157 क्रमांकाच्या टोळीत 93 कामगारांची नोंदणी असली तरी प्रत्यक्षात या ठिकाणी फक्त 45 कामगार काम करीत आहेत. हे वास्तव असले तरी माथाडी मंडळ मात्र 93 कामगारांचा पगार काढत आहे. मेहनत करूनही कमी पगार हातात पडत असल्याने या 45 कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
माथाडी कामगारांचा पगार हा त्यांच्या अंगमेहनतीवर निघतो. जेवढे काम होईल तेवढाच मोबदला त्यांना दिला जातो. भाजीपाला मार्केटच्या लिलावगृहात 157 क्रमांकाची माथाडी कामगारांची टोळी काम करत असून त्या टोळी 93 कामगारांची नोंदणी झाली आहे. मात्र गेल्या 17 वर्षांपासून या टोळीतील फक्त 45 कामगार मार्केटमध्ये काम करत आहेत. बाकीचे कामगार कोण आहेत, हे त्यांच्या सहकारी कामगारांना माहीतही नाहीत. जीवतोड मेहनत हे 45 कामगार करत असले तरी माथाडी मंडळ मात्र 93 कामगारांचा पगार काढत आहे. या 45 कामगारांच्या मेहनतीचा पैसा अन्य कामगारांना दिला जात आहे. याबाबत या टोळीतील अन्यायग्रस्त कामगार अनिल पवार यांनी माथाडी मंडळ, युनियन आणि कामगार मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून सदर प्रकार थांबवण्याची मागणी केली. मात्र त्यांच्या मागणीची कोणीही दखल घेतली नाही. कष्ट 25 चे पगार फक्त 10 हजार रुपये.
17 वर्षांपूर्वी या टोळीतील कामगारांना महिन्याचा पगार सुमारे 17 ते 20 हजार रुपये होता. आता तो महागाईच्या तुलनेत वाढणे आवश्यक असले तरी प्रत्यक्षात मात्र कमी झाला आहे. या कामगारांना कष्ट 25 हजार रुपयांचे करावे लागत असून पगार फक्त 10 हजार रुपये घ्यावा लागत आहे. त्यामुळे हे 45 कामगार भरपूर काबाडकष्ट करूनही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.






























































