
वाई शहरात दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. शहरात भाजी, किराणा माल व औषधासाठी मिळणाऱया शिथिलतेचा गैरफायदा घेऊन नागरिक रस्त्यावर गर्दी करीत आहेत. त्यामुळे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहर मंगळवारी रात्रीपासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे.
कोरोना उपाययोजनांच्या आढाव्यासाठी नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आमदार मकरंद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार रणजित भोसले, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ, नगराध्यक्षा डॉ. प्रतिभा शिंदे, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, गटविकास अधिकारी उदयकुमार कसुरकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव आदी उपस्थित होते.
वाई शहरात दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण नव्याने आढळून येत आहेत. शहरात भाजी, किराणा माल व औषधासाठी मिळणाऱया शिथिलतेचा गैरफायदा घेऊन नागरिक मोठय़ा प्रमाणावर रस्त्यावर गर्दी करीत आहेत. यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. शहरात सूक्ष्म लक्षणे असलेले, उपचारानंतर घरी सोडलेले रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. त्यातील काही रुग्ण बाहेर फिरत असल्याने रुग्ण वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरात 42 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आल्याचे प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले यांनी सांगितले. मात्र, त्याची कडक अंमलबजावणी होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याची सूचना आमदार मकरंद पाटील यांनी केली.
मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ यांनी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांचा समन्वय ठेवावा. सर्व नगरसेवकांच्या मदतीने शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांचा नागरिकांना त्रास होणार नाही, असे नियोजन करावे, असे सुचविले. घरपोहोच साहित्य मिळण्याची व्यवस्था उभारण्यास प्राधान्य देण्यास सांगितले.
रुग्णांना मतदारसंघातच उपचार मिळण्याला प्राधान्य
n वाईतील किसन वीर महाविद्यालयात विलगीकरण कक्ष सुरू झाला आहे. कवठे उपकेंद्र व मॅप्रो आय हॉस्पिटलमधील यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालण्यासाठी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. ते काम एक-दोन दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे आपल्या भागात अतिदक्षता विभाग, प्राणवायू खाटा मोठय़ा प्रमाणात उपलब्ध होतील. येथील प्राणवायू पुरवठा सुरळीत व नियमित राहण्यासाठी यंत्रणा उभारण्यात आली आहे. मुख्य म्हणजे यासाठी डॉक्टर, परिचारिका, सेवक, तंत्रज्ञ यांची उपलब्धता करण्यात आली असून, आता मतदारसंघातच उपचारासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली.
मोठय़ा प्रमाणावर उभारलेली यंत्रणाही पडतेय तोकडी
n वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नागरिकांना कोरोना संसर्ग झालेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात उभारलेली यंत्रणाही तोकडी पडताना दिसते आहे. तापोळा, महाबळेश्वर, डॉन अकॅडमी, बेल एअर हॉस्पिटल, वाईतील डॉ. घोटवडेकर, डॉ. बाबर, डॉ. कद्दू, डॉ. मेणबुधले, वाई ग्रामीण रुग्णालय खंडाळा तालुक्यातही शासकीय व खासगी ठिकाणी उपचार सुरू आहेत. रुग्णालये अधिग्रहित केली असून, यंत्रणा उभारल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी सांगितले.

































































