नवी मुंबई पोलिसांच्या मोक्कातला वॉण्टेड गावठी जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खून, खुनाचा प्रयत्न आणि बेकायदेशीर झोपड्या बांधण्याच्या गुन्ह्यातील आरोपी तसेच नवी मुंबई पोलिसांनी मोक्का लावलेला असतानाही गेल्या दोन वर्षांपासून वॉण्टेड असलेला गुन्हेगार अखेर गजाआड झाला. मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-5 च्या पथकाने त्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या.

उमेश जौजाळ उर्फ गावठी (30) असे त्या गुन्हेगाराचे नाव आहे. नवी मुंबई पोलिसांनी गावठीला मोक्का लावला होता. पण तो दोन वर्षांपासून लपून राहत होता. उमेश फोर्ट परिसरात येणार असल्याची खबर युनिट-5 चे पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार प्रभारी पोलीस निरीक्षक जगदीश साईल यांच्या मार्गदर्नाखाली योगेश चव्हाण तसेच पथकाने फोर्ट परिसरात सापला रचून उमेश जौजाळ उर्फ गावठी याला पकडले. त्याला पुढील कारवाईकरिता नवी मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले. टिळक नगर आणि देवनार परिसरात अरविंद सोढा याची टोळी बेकायदेशीर झोपड्या बांधायचा गोरखधंदा करते. त्या टोळीचा उमेश गुंड आहे. त्याच्या विरोधात आरसीएफ तसेच कामोठे पोलीस ठाण्यात हत्येचा तर वडाळा टी. टी. पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे.