
मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीला बसत असून, दिल्ली ते न्यूयॉर्क हा प्रवास हिंदुस्थानी उद्योजक संजय बर्नवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरला. स्पाइनचे सह-संस्थापक आणि सीईओ संजय वर्णवाल हे कुवेतमध्ये अडकले आहेत. अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकचे हवाई क्षेत्र अचानक बंद करण्यात आले. २८ फेब्रुवारीला पहाटे ३ वाजता दिल्लीहून कुवेतकडे प्रस्थान केल्यानंतर वर्णवाल सकाळी ९ वाजता न्यूयॉर्कमधील जाॅन केनेडी या विमानतळाकडे जाणाऱ्या फ्लाइटची प्रतीक्षा करत होते. सकाळी ८:४५ वाजता कुवेतहून उड्डाण झाल्यानंतर सर्व काही सुरळीत होते.
मात्र उड्डाणाच्या सुमारे ४५ मिनिटांनी पायलटने घोषणा केली की, इराकचे हवाई क्षेत्र अचानक बंद करण्यात आले आहे आणि सुरक्षा कारणास्तव विमानाला कुवेतला परतावे लागेल. सुरुवातीला तांत्रिक अडचण असावी असे वाटली, परंतु परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे लवकरच स्पष्ट झाले.
कुवेतमध्ये परतल्यानंतर विमानतळावर अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले. एअरलाइनकडून दुपारी १:३० वाजताची सुधारित वेळ जाहीर करण्यात आली आणि बोर्डिंग पास पुन्हा देण्यात आले. मात्र काही तास उलटूनही उड्डाणे सुरू झाली नाहीत. दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व विमाने ‘ग्राउंड’ करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
वर्णवाल यांच्या मते, सुमारे १ हजार प्रवासी ट्रान्झिट हबमध्ये अडकले होते. स्थानिक प्रवासी घरी परतले, परंतु आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विमानतळावरच थांबावे लागले. सायंकाळी ५ वाजेपर्यंत एअरलाइनने प्रवाशांना शहरातील विविध हॉटेलमध्ये हलवण्याची प्रक्रिया सुरू केली. मोठ्या संख्येने प्रवासी, बसेसची ये-जा आणि पोलिस बंदोबस्त यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. रात्री १० वाजेपर्यंत तीन-चार हॉटेलमध्ये प्रवाशांची व्यवस्था करण्यात आली होती.
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षामुळे आखाती देशांतील प्रमुख ट्रान्झिट केंद्रांवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे रद्द किंवा वळवण्यात आल्याने हजारो प्रवासी अडकले आहेत. हवाई मार्ग बंद होणे आणि सुरक्षेच्या कारणास्तव घेतले जाणारे तातडीचे निर्णय यामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासात अनिश्चितता वाढली आहे. सध्या हवाई मार्ग पुन्हा सुरू होण्याची प्रतीक्षा सर्व प्रवाशांना लागली आहे.






















































