
रशियाने युक्रेनवर आक्रमण करून एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी युद्ध सुरूच आहे. रशियन फौजांच्या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून, लाखो नागरिकांनी देश सोडला आहे. मात्र, आता युद्ध संपवण्याची डेडलाईन रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी निश्चित केली आहे. 9 मेपर्यंत हे युद्ध संपवणार असल्याचे वृत्त आहे.
‘क्यीव इंडिपेंडंट’ने याबाबत वृत्त दिले आहे. दुसऱया महायुद्धात 9 मे रोजी हिटलरच्या जर्मनीतील नाझी फौजांचा पराभव झाला होता. 9 मे हा दिवस रशियामध्ये विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या पार्श्वभूमीवर 9 मेपर्यंत युक्रेन युद्ध संपवून विजयी दिवस साजरा करण्याचा रशियाची योजना आहे. त्यामुळे आणखी दीड महिना तरी युक्रेन युद्ध सुरू राहील. रशियाकडून हल्ले वाढवले जातील. राजधानी क्वीववर कब्जा मिळविला जाईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
…तर अमेरिकेसह नाटोच्या फौजा युद्धात उतरतील – बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाला इशारा दिला आहे. रासायनिक अस्त्र्ाांचा वापर केला तर रशियाविरुद्ध लढण्यासाठी अमेरिकेसह नाटो देशांच्या फौजा उतरतील. दरम्यान बायडेन यांनी नाटो देशांची तातडीची बैठक बोलविली. रशियाविरुद्धचे निर्बंध दीर्घकाळ सुरू ठेवण्याचा निर्णय होणार आहे.


























































