
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपी विकेश ऊर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला पहाटेच्या सुमारास न्यायाधीश रत्नमाला डफरे यांच्या समक्ष उपस्थित करण्यात आले होते. सुरक्षेच्या कारणामुळे पोलिसांनी त्याला गुप्त स्वरुपात न्यायालयात हजर केले असल्याचे वृत्त आहे. विकेशची रवानगी आता कारागृहात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विकेश उर्फ विक्की ज्ञानेश्वर नगराळे (27,रा दारोडा) याने 3 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास प्राध्यापक तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळले होते. यामध्ये ती 40 टक्के भाजली असून तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र रोष पसरला होता तसेच ठिकाणी आंदोलन देखील करण्यात आले होते. दरम्यान घटनेतील आरोपी विकेश उर्फ विकी नगराळे याला घटनेच्या दिवशी पोलिसांनी त्याला बुट्टीबोरी जवळील टाकळघाट येथून अटक केली होती.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 8 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली होती. दरम्यान आरोपीला शनिवारी रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. मात्र पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयाने आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पुढील तपासात गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी पोलीस कोठडी मिळावी अशी विनंती पोलीस प्रशासनाकडून करण्यात आली होती. ती देखील मान्य करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. त्यानुसार आरोपीला जिल्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे.





























































