
गुरूवारी रात्रीपासून अमरावती जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असल्यामुळे अप्परवर्धा धरण पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे या धरणाचे तेराही दरवाजे उघडण्यात आले आहे. धरणानंतर ज्या मार्गाने वर्धा नदी वाहते. ती सुद्धा दुथडी भरून वाहत आहे. परिणामी अमरावती वरून वर्धेकडे जाणारा मार्ग आज दुपारपासून बंद झाला आहे.
रुक्मिणीचे माहेरघर असलेल्या कौंडण्यपूरवरून वर्धा नदी वाहत आहे. पलिकडच्या काठावर वर्धा जिल्ह्याची सीमारेषा आहे. नेमक्या याच ठिकाणी वर्धा नदीवर पूर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वर्धाकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. अप्परवर्धा धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे ही नदी दुथडी भरून वाहत आहे.
सलग पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातले सर्वच नदी व नाले दुथडी भरून वाहत आहे. काही छोट्या नद्यांना पुरही आले आहे. जलसाठ्यात वाढ होत असल्याने वर्धा नदीवरच्या अप्पर वर्धा धरणाचे संपूर्ण 13 दरवाजे दोन मिटरने शुक्रवारी संध्याकाळ पासून उघडे आहे. या दरवाज्यातून 4238 घनमीटर प्रतिसेकंदाने विसर्ग सुरू आहे. परिणाम स्वरूप वर्धा नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. ही नदी तिवसा तालुक्यातल्या कौंडण्यपूर जवळून वाहते. येथे वर्धा जिल्ह्याला जोडणारा पूल आहे. या पूलावरून पाणी वाहत असल्याने अमरावती – वर्धा मार्ग दुपारी 1 वाजल्यापासून बंद झाला आहे. तसेच वर्धा नदीवर धामणगाव रेल्वे जवळ असलेल्या निम्न वर्धा धरणाचेही 31 दरवाजे उघडण्यात आले आहे. पुढे ही नदी हिंगणघाट मार्गे चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेशित होत असल्याने नदी काठच्या सर्व गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यातल्या अचलपूर तालुक्यातील चंद्रभागा धरणाचे 3, सपन धरणाचे 2, दर्यापूर तालुक्यातल्या शहानूर धरणाचे 2, चांदूर बाजार तालुक्यातल्या पूर्णा धरणाचे 9 दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा वेगाने विसर्ग सुरू आहे. ज्या नदींवर ही धरणे आहे, त्या नदी काठच्या गावांना सर्तकतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. चारघड धरणही ओव्हर फ्लो झाले आहे. शनिवारी सकाळी 8 वाजता झालेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 29.07 मिमी पाऊस झाला होता. वरूड व चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक पाऊस गेल्या 24 तासात झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 660.30 मिमी पाऊस झाला आहे. अपेक्षित पावसाच्या तुलनेत त्याची टक्केवारी 95.6 आहे.






























































