मालवणात कचरा प्रश्न पेटला; संतप्त नागरिकांची नगरपालिकेवर धडक

मालवण शहरात भर वस्तीतील एका खाजगी जागेत कचऱ्याचे ढीग साचल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत. कचऱ्याच्या दुर्गंधीने घरात राहणे, श्वास घेणेही मुश्किल झालेल्या नागरिकांनी नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना जाब विचारला. नागरिकांनी आपल्या समस्या नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बांधकाम सभापती यतीन खोत यांच्याजवळ मांडल्या. त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले.

सर्व कचरा तात्काळ उचलून डम्पिंग ग्राउंड येथे टाका, असे आदेश नगराध्यक्ष यांनी मुख्याधिकारी यांना दिले. कचरा चुकीच्या पद्धतीने ज्यांनी टाकला त्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. त्यांच्याकडून सर्व खर्च वसूल करा, असेही नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले आहे. बांधकाम सभापती खोत यांनीही तात्काळ कार्यवाही करा, कचरा व दुर्गंधी प्रश्न सुटला पाहिजे. नागरिकांना कोणतीही समस्या राहता नये. या पद्धतीने कार्यवाही करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

दगड माती अथवा प्रक्रिया केलेला कचरा एका खाजगी जागेत टाकावा, अशी लेखी परवानगी एका खाजगी जागा मालकाने घेतली होती. मात्र मालवण शहरातील देऊळवाडा सागरी महामार्ग याठिकाणी अगदी लोकवस्तीतच मालवण पालिका स्वच्छता विभागाने शहरातील दुर्गंधीयुक्त कचऱ्याचे ढीग टाकले.

याप्रकरणी नागरिकांनी पालिकेवर धडक देत मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना जाब विचारला. मात्र मुख्याधिकारी यांनी खाजगी जागेत कचरा टाकण्यात आल्याचे सांगितले. त्यांनी तक्रारीला योग्य प्रतिसाद न दिल्याने नागरिक संतप्त झाले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व बांधकाम सभापती यतीन खोत नागरिकांसोबत घटनास्थळी पोहोचले. यावेळी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, गटनेते गणेश कुशे, नगरसेवक जगदीश गावकर, यासह मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारीही दाखल झाले. सर्वच लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. उपनगराध्यक्ष वराडकर आक्रमक झाले. अखेर नगराध्यक्ष यांच्या आदेशानुसार कचरा हटवण्याची कार्यवाही तात्काळ सुरू केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले.

 

आपली प्रतिक्रिया द्या