‘मेट्रो’च्या कामात जलवाहिनी फुटली; फोर्टमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत

पालिकेच्या ‘ए’ विभागात चर्चगेट येथील जीवन विमा मार्गावर मेट्रो-3 चे काम सुरू असताना 1200 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती लागली आहे. या जलवाहिनीची शनिवार, 11 मे रोजी दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या आठ तासांच्या कालावधीत दुरुस्ती करण्यात येणार आहे. यामुळे  या आठ तासांच्या कालावधीत कुलाबा, कोळीवाडा आणि नौदल परिसरास होणारा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील  रहिवाशांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या ‘ए’ विभागात पाणीपुरवठा करण्यासाठी क्रॉस मैदान बोगद्यातून 1500 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीद्वारे पुढे 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीचा उपयोग केला जातो. या जलवाहिनीतून होणारा पुरवठा हा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होत असल्याचे आढळल्यानंतर शोध घेण्यात आला. यामध्ये मंत्रालय इमारतीजवळ जीवन विमा मार्ग येथे मेट्रो-3 चे काम सुरू असताना या 1200 मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीस गळती झाल्याचे निदर्शनास आले. यानंतर महानगरपालिकेच्या ‘तातडीच्या दुरुस्ती’ विभागाने घटनास्थळी पाहणी केली. सदर जलवाहिनीची ही गळती लवकरात लवकर दुरुस्त करावी लागणार आहे, अन्यथा गळतीमुळे पाणी वाया जाण्यासह रस्ता खचण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो. सदर गळतीच्या दुरुस्तीसाठी सुमारे सात ते आठ तासांचे अलगीकरण करावे लागणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता, तसेच मंत्रालय व मरीन ड्राइव्ह हा परिसर आत्यंतिक महत्त्वाचा असल्याने महानगरपालिकेने मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांशी तातडीने संपर्क साधून या दुरुस्ती कामाचे प्राधान्य कळवले आहे. त्यानुसार वाहतुकीचे नियोजन होण्याच्या दृष्टीने दुरुस्ती कामाची परवानगी घेतली आहे.

असा होणार पाणीपुरवठय़ावर परिणाम

– मरीन ड्राइव्ह वाहतूक पोलिसांनी 11 मे रोजी सदर जलवाहिनीच्या दुरुस्तीला परवानगी दिली आहे. जलवाहिनीतील पाणी उपसा करून नंतर प्रत्यक्ष दुरुस्तीचे काम दुपारी 3.30 वाजल्यापासून केले जाईल.  तोपर्यंत संबंधित भागातील सकाळ व दुपार सत्रातील पाणीपुरवठा दिला जाईल.

– दुपारी 3.30 ते रात्री 11.30 या आठ तासांच्या प्रत्यक्ष दुरुस्ती कालावधीत कुलाबा (नियमित पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30), कोळीवाडा अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा वेळ- सायंकाळी 6.30 ते सायंकाळी 6.45 आणि नौदल अतिरिक्त विशेष पाणीपुरवठा 6.50 ते सायंकाळी 7.05 या परिसरांना होणारा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

– तसेच नौदलास रात्री 10.30 ते पहाटे 2.50 या कालावधीत केला जाणारा नियमित पाणीपुरवठा हा दुरुस्ती काम पूर्ण झाल्यानंतर, जलवाहिन्या भारीत (चार्जिंग) करून त्यानंतर म्हणजेच नियमित पाणीपुरवठय़ाच्या तुलनेत विलंबाने होईल.