वांद्रय़ात जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया! प्रवाशांचे हाल, वाहतूक ठप्प

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वांद्रे पश्चिम एसव्ही रोडवर आज पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया गेले. रस्त्यावर अचानक गुडघाभर पाणी आल्याने वाहतूकही ठप्प झाली. शिवाय स्थानिक आणि प्रवाशांनाही मनस्ताप सहन करावा लागला.

वांद्रे पश्चिम येथील एसव्ही रोडवरील लकी हॉटेलजवळ मुख्य रस्त्यावर फुटलेल्या जलवाहिनीतील पाण्याचा प्रवाह इतका जास्त होता की काही क्षणांत संपूर्ण रस्ता जलमय झाला. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. साचलेल्या पाण्यातूनच प्रवाशी, रहिवाशांना वाट काढावी लागल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतुकीचे हे महत्त्वाचे जंक्शन असल्याने वाहनचालक-प्रवाशांचेही यामध्ये हाल झाले. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पालिकेचे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरातील पाणीपुरवठय़ावर मोठा परिणाम होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जलवाहिनी गळती-दुरुस्तीचे काम पालिकेने तातडीने सुरू केले. जलवाहिनी दुरुस्तीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.