
धरण पाणलोट क्षेत्रात सलग चौथ्या दिवशी अतिवृष्टी झाल्याने कोयना आणि चांदोली धरणातून आज पाणी सोडण्यात आले. चांदोली धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून 2152 क्युसेक, तर वीजनिर्मिती केंद्रातून 1648 क्युसेक असा 3800 क्युसेक, तर कोयना धरणातून पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दोन्ही धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा काठावर पुराची धास्ती निर्माण झाली आहे. सांगलीच्या आयर्विन पुलाची पाणीपातळी 27 फुटांवर स्थिर आहे. मात्र, वारणेची पाणीपातळी बुधवारी वाढण्याची शक्यता आहे. जिह्यातही दिवसभर पावसाची संततधार सुरूच राहिली.
चांदोली आणि कोयना क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला. चांदोलीत चोवीस तासांत 110 मि.मी. पाऊस झाला असून, धरण 82.51 टक्के भरले आहे. त्यामुळे दुपारपासून धरणाचे चार वक्राकार दरवाजे उचलून 3800 क्युसेकने पाणी सोडण्यात आले. कोयना धरण येथे 164 मि.मी. पाऊस झाला असून, धरणातही पाण्याची चांगली आवक आहे. त्यामुळे पायथा वीजगृहातून 1050 क्युसेकने पाणी सोडले आहे. यामुळे वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
वारणा नदीवरील सहा पूल पाण्याखाली
वारणा नदीची पाणीपातळी वाढल्याने मांगले-सावर्डे, समतानगर, येळापूर-वाकुर्डे, कांदे मांगले, सावर्डे, कोरेगाव पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद केली आहे. कोकरूड-रेठरे, किणी, शिगाव, दुधगाव, समडोळी बंधारा पाण्याखाली गेला आहे. धरणाचे दरवाजे उघडल्यावर पाणीपातळीत वाढ होणार असल्याने दक्षता म्हणून शित्तूर व सोंडोली पूल दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता. मणदूर, सम्राट अशोकनगर दरम्यानचा फरशी पूल वाहून गेला आहे. अतिवृष्टीमुळे, करमजाई धरणापासून बिऊरकडे जाणारा कॅनॉल बादेवाडीजवळ थोरात वस्तीच्या वरच्या बाजूला फुटला. कॅनॉल फुटल्याची माहिती मिळताच, प्रशासनाकडून पाहणी करून तातडीने दुरुस्ती उपाययोजना केल्या. रविवारी झालेल्या अतिवृष्टीचा फटका अनेक घरांना बसला. विभागातील अनेक गावांत घरांच्या भिंती पडून नुकसान झाले. सांगली जिह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 12.1 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात सर्वाधिक 31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
पुलांची पाणीपातळी फुटांमध्ये पुढीलप्रमाणे ः कृष्णा पूल कराड 16.7 फूट, बहे पूल 9.3, ताकारी पूल 28, भिलवडी 28.8, आयर्विन सांगली 27, राजापूर बंधारा 42.01 फूट.