
यंदा पाऊस लांबल्याने कोयना धरणातील पाणीसाठा घटला आहे. धरणात अवघे 12 टीएमसी पाणी असल्याने टंचाईचा सामना करावा लागणार आहे. मागील चार दिवसांपासून कृष्णा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. कोयनेचे पाणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सांगलीमध्ये पोहोचणार असल्याचे जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले. त्यामुळे तूर्त पिण्याच्या पाण्याची समस्या सुटण्याच्या आशा आहेत.
जूनचा दुसरा आठवडा संपत आला तरी पावसाने हजेरी लावली नाही. मृग नक्षत्र कोरडे ठणठणीत गेले. पाऊस लांबल्याने सांगली आणि सातारा जिह्यातील धरणांतील घटलेला पाणीसाठा पाहाता टंचाईचे सावट निर्माण होण्याची भीती आहे. कोयना धरणात 12.08 टीएमसी, तर चांदोली (वारणा) धरणात 11.48 टीएमसी पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. धरणामध्ये अपुरे पाणी असल्याने पाणी कमी प्रमाणात सोडण्यात येत आहे. नदीकाठावर सिंचनासाठी व कारखान्यासाठी मोठय़ा प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने पाणीटंचाई जाणवत आहे.
गेल्या चार दिवसांपासून कृष्णा नदीपात्र कोरडे पडले आहे. पाणीटंचाईची परिस्थिती ओढवली असताना कोयना धरणातून 1 हजार 50 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. कोयनेचे पाणी सोडले असले तरी कृष्णा नदीमध्ये मोठ-मोठे डोह आहेत. ते सध्या कोरडे आहेत, त्यामुळे पाणी पुढे सरकण्यास विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी संध्याकाळी नागठाणेपर्यंत पाणी पोहोचले आहे. कोयनेचे पाणी गुरुवारी संध्याकाळपर्यंत सांगलीमध्ये पोहोचण्याची शक्यता जलसंपदा विभागाने व्यक्त केली आहे.
धरणातील पाणी कमी झाल्याने शेतीच्या पाण्यावर उपसाबंदी घालण्यात आली आहे. अपुऱ्या पाण्यात औद्योगिक क्षेत्रातील व गावांतील सांडपाणी मिसळून ते प्रदूषित होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळ सतर्क झाले आहे. नदीपात्रात अपुरे पाणी असल्याने पिण्यासाठी गढूळ व दूषित पाणीपुरवठा होऊन साथीचे आजार वाढण्याचा धोका आहे, त्यामुळे पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे.





























































