शाळेची घंटा पाणी पिण्याची आठवण करून देणार

734

शाळेत नेलेल्या खाऊच्या डब्याबरोबर मुले पाण्याची बाटलीही परत घरी आणतात. पाणी पिण्याची आठवणीही त्यांना राहत नाही. खाण्याबरोबरच शरीरासाठी पाण्याची आवश्यकता असते. मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी एका सत्रात तीन वेळा घंटा वाजवावी अशी मागणी शिवसेनेने पालिकेकडे केली होती. या प्रस्तावाला आज झालेल्या महासभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता पालिका आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये मुलांना पाणी पिण्याची आठवण करून देण्यासाठी घंटा वाजणार आहे.

मुंबईतील पालिका आणि अनुदानित शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मूलभूत गरज असलेले स्वच्छ पाणीही आहे, मात्र अभ्यास, खेळ आणि काही वेळा कडक शिस्तीचे शिक्षक असल्यामुळे मुले पाणी पिण्यास टंगळमंगळ करतात. या सगळ्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि सर्वांगीण विकासावर होत असतो. अशी मुले अभ्यास आणि खेळातही मागे पडतात. त्यामुळे खाण्याबरोबरच योग्य प्रमाणात पाणी प्यायले जावे यासाठी मुलांना एका सत्रात तीन वेळा बेल िंकवा घंटा वाजवून पाणी पिण्याची आठवण मुलांना करून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक सचिन पडवळ यांनी केली होती. केरळमध्ये अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात आली आहे. त्याचा फायदाही दिसून आला आहे. त्यामुळे केरळच्या धर्तीवर इथेही याची यशस्वी अंमलबजावणी करता येईल, असेही पडवळ म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या