
डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरासह आजूबाजूच्या ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्याचा ठणठणाट असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भागातील पाणीपुरवठा अनियमित आहे. अगदी अलीकडेच पाणीटंचाईचा प्रश्न तीव्र झाल्यावर एका दिव्यांग वयोवृद्ध नागरिकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. 7 नोव्हेंबर रोजी एमआयडीसी कार्यालयावर धाव घेत अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. एमआयडीसी निवासी-सुदामानगर परिसरातील नवसंकुल सोसायटीचे रहिवासी सुदेश बेर्डे यांनी पाणीटंचाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत एमआयडीसी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत नागरिक सत्ताधाऱ्यांना जाब विचारतील, असा इशारा दिला आहे.




























































