संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाई, गाव तहानले

सामना प्रतिनिधी, संगमेश्वर

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात पाणीटंचाईची दाहकता वाढू लागली आहे. तालुक्यात सध्या 6 गावांमधील 14 वाड्या या तहानलेल्या आहेत. या वाड्यांना खासगी टँकरद्वारे येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरू केला जाणार असल्याची माहिती पंचायत समिती सूत्रांनी दिली आहे. तालुक्यामध्ये मार्च महिन्यातच पाणीटंचाईच्या झळा पोहोचू लागल्या. दोन गावे व सहा वाड्यांनी टँकरची मागणी या महिन्यामध्ये प्रशासनाकडे केली होती. या गाव व वाड्यांमध्ये वाढ होऊ लागली आहे. एप्रिल महिन्याच्या प्रारंभी आणखी यात चार गावे व 8 वाड्यांची वाढ झाली आहे. या ग्रामपंचायतीने देखील प्रशासनाकडे टँकरची मागणी केली आहे.

पंचायत समितीकडे एक शासकीय टँकर उपलब्ध आहे, मात्र यावर चालक नसल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खासगी टँकर उपलब्ध करावा अशा सूचना दिल्या आहेत. यानुसार पंचायत समितीने शेनवडे गावातील (धनगरवाडी, गवळीवाडी व दंड) पुर्येतर्फ देवळे गावातील (धनगरवाडी), राजिवली (येडगेवाडी, कावीळटेप), मासरंग (धनगरवाडी), विघ्रवली (बौध्दवाडी, खालचीवाडी, माळवाडी, राववाडी) तसेच पाचांबे (नेरदवाडी, जखीणटेप, मेढे) या गाव व वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरची मागणी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. येत्या दोन दिवसात खासगी टँकरला मंजुरी मिळणार आहे. याप्रमाणे प्रशासनाने दोन खासगी टँकरची उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मंजुरी मिळताच दोन्ही खासगी टँकर प्रत्यक्ष पाणी पुरवठा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

पाणी योजना मंजूर होऊनही 7 वर्षात योजना पूर्णत्वास न गेल्याने तुळसणी मुस्लिम मोहल्ल्यातील 250 लोकांना 4 किमी पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. दरवर्षी डिसेंबरनंतर सुरू होणारी ही पायपीट जुनपर्यंत सुरू असते. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील पाण्याची समस्या सोडवण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. तुळसणी मुस्लिम मोहल्ल्यातील सुमारे 250 कुटुंबांना गेले काही वर्षे पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नोव्हेंबर किंवा डिसेंबरपासून पुढील 6 महिने तब्बल 4 किमीची पायपीट करून येथील महिलांसह ग्रामस्थ आपली तहान भागवतात. शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत तुळसणी मुस्लिम मोहल्ला व राऊळवाडी यांच्यासाठी 38 लाख रुपयांची नळपाणी योजना 2008 साली मंजूर झाली. 2012 ला प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली. यामुळे यावाडीतील टंचाई दूर होईल अशी ग्रामस्थांना अपेक्षा होती. प्रत्यक्षात त्यांचा भ्रमनिरास झाला. सात वर्षे होत आली तरी ही योजना पूर्ण झालीच नाही. अजूनही या नळपाणी योजनेचे 30 टक्के सुध्दा काम झालेले नाही. निधी असूनही ही योजना का झाली नाही? याबाबत संभ्रम आहे.

गेली सात वर्षे येथील ग्रामस्थ या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत. मात्र त्यांच्या पदरी निराशाच आली आहे. विशेष म्हणजे ग्रामपंचायतही या योजनेबाबत माहिती देण्यास नकार देत आहे. शेवटी ग्रामस्थांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करत माहिती मिळविली आहे. गेली अनेक वर्षे नळपाणी योजनेसाठी आमचा शासनाबरोबर संघर्ष सुरू आहे. याला यश येत नाही. सध्या पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकावे लागत आहे. सर्वच कुटुंब तर खासगी टँकर विकत घेत आहेत. प्रशासनाकडे वारंवार याबाबत चर्चा करून सुद्धा ते दुर्लक्ष करत आहे. नळपाणी योजना पूर्ण होईपर्यंत शासनाने टँकरने पाणी पुरवावे, अशी मागणी मोहल्ल्यातील ग्रामस्थांनी केली आहे.