परभणीत पाणीपातळी खालावली, ग्रामीण भागात तीव्र पाणी टंचाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी 

ऑक्टोबर हिटमुळे परभणी जिल्ह्यात पाणी पातळी दिवसेंदिवस खोल जाऊन विहिरीने आत्ताच तळ गाठण्यास  सुरुवात केल्याने ग्रामीण भागात पाणीसंकट दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्यात भरीस भर म्हणून वाढत्या भारनियमनामुळे काही भागात पाणी उपलब्ध असतानाही पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीपातळी खोल जात असल्याने टँकरचे नियोजन करणे हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

परभणी जिल्ह्यातील पाणीपातळी ऑक्टोबर महिन्यात जवळपास १ मिटरने खालावली आहे. सोनपेठ तालुक्यातील सर्वाधिक ३.५४ मिटरने ती खालावल्याची माहिती भूजल विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यातच पाणीपातळी खालावल्याने आतापासूनच शहरासह ग्रामीण भागामध्ये पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाला आतापासूनच पाणीटंचाई निवारणासाठी कठोर उपाययोजना कराव्या लागणार आहेत. परंतु, जिल्हा प्रशासनाकडून मात्र पाणीटंचाई निवारणाकडे पूर्णत: दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. जिल्ह्यात भीषण पाणीटंचाईचे चित्र समोर दिसत असताना जिल्हा प्रशासन मात्र हा प्रश्न गांभीर्याने हाताळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

ग्रामीण भागात १२ ते १४ तासांचे भारनियमन केले जात आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईशी जीवघेणा सामना करावा लागत आहे. बहुतांश भागातमध्ये उन्हाळ्यातील पाणीटंचाईसदृश्य परिस्थिती पहावयास मिळत आहे. प्रशासनाने वेळीच उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिल्हाभरातून जोर धरु लागली आहे. प्रशासनाने एकीकडे जिल्ह्यातील बहुतांश तालुके हे दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले असले तरी प्रभावी उपाययोजना मात्र अद्याप केली नसल्याने नागरिकांमध्ये सतांप व्यक्त केला जात आहे.

दुष्काळग्रस्त भागाची पाहणी लोकप्रतिनिधींनी नुकतीच केली असली तरी या परिस्थितीवर मात करण्यासाठी सुचना मात्र अद्यापही जारी करण्यात आल्या नाहीत. प्रभावी उपाययोजना करण्यात आली नसल्याने सध्या सर्वत्र टंचाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी  दुसरी पेरणी देखील करण्यात आली नाही. परिणामी चाराप्रश्नही गंभीर बनला आहे. चारा छावण्या उभारण्याची मागणी सध्या जोर धरु लागली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात यंदा पावसाळ्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे छोट्या-मोठ्या धरणामध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. तर काही तालुक्यातील तलाव कोरडेठाक पडले असून जिल्ह्यातील भूजलपातळी ऑक्टोबर महिन्यातच खालावल्याने शेकडो गावांतील ग्रामस्थांना हिवाळ्यामध्येच पिण्याच्या पाण्यासाठी भटंकती करावी लागत असल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात भूजलपातळी खोल गेली नव्हती. परंतु, यंदा मात्र जिल्ह्याची भूजलपातळी १ मिटरने खोल गेली आहे. सोनपेठ तालुक्यातील ३.५४ मिटरने पाणीपातळी खोल गेल्याने विहिरी व बोअर पाण्याअभावी कोरडेठाक पडू लागल्याने शहरासह ग्रामीण भागामध्ये पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरूवात झाली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. परभणी जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्यामुळे शिवाय भर पावसाळ्यामध्ये पावसाचा खंड पडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जलयुक्त शिवारे सध्या कोरडया अवस्थेत दिसून येत आहे. धरणाची पाणीपातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. विहिरी आणि बोअरचे पाणी देखील कमी जास्त प्रमाणात येत असल्याने सध्या पाणीटंचाई हा चिंतेचा विषय बनला असल्याचे चित्र दिसून येत आहे.