
सामना प्रतिनिधी । कुडाळ
तालुक्यातील पाणी टंचाईच्या कामांना निधी कमी पडू देणार नाही. जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जातील मात्र प्रत्येकाने सुचविण्यात येणार्या कामांचे परिपूर्ण प्रस्ताव आणि तेही वेळेत सादर करावेत.जेणेकरून प्रस्तावांना वेळेत मंजूरी मिळून कामेही वेळेत पूर्ण होतील अशा सुचना आमदार वैभव नाईक यांनी संबंधितांना दिल्या.
कुडाळ पंचायत समितीच्या अल्पबचत सभागृहात सोमवारी आमदार वैभव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणी टंचाई निवारण आढावा बैठक पार पडली. जि.प.उपाध्यक्ष रणजित देसाई, सभापती राजन जाधव, उपसभापती श्रेया परब, तहसिलदार अजय घोळवे आदींसह तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
सुरुवातीला नाईक यांनी संबंधितांकडून पाणी टंचाईच्या कामांचा आढावा घेत आवश्यक सुचना केल्या. यावर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला असल्याने मार्च ते मे दरम्यान पाणीटंचाईची झळ काही ठिकाणी बसण्याची शक्यता आहे. मात्र अपूर्ण कामे पूर्ण झाल्यावर तालुक्यात काही ठिकाणी भासणारी पाणी टंचाई कमी होऊ शकते. तसेच ग्राम पंचायतींनी संभाव्य पाणी टंचाईच्या दृष्टीने कामांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत सादर करावेत. जास्तीत जास्त प्रस्ताव मंजूर होण्यासाठी प्रयत्न केले जातील शिवाय निधीही कमी पडू दिला जाणार नाही. कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाने दक्षता घ्यावी. वनराई बंधा-यांमुळे पाणी टंचाईवर मात होणार आहे, असे नाईक यांनी यावेळी सांगितले.
देसाई म्हणाले की, राज्यात दुष्काळाचे सावट निर्माण होत असतानाच कोकणात मात्र पाणीटंचाईचे चटके जाणवत नाहीत. मात्र यंदा पाऊस कमी झाला आहे. वर्षानुवर्षे पाणी टंचाई आढावा बैठका घेतल्या जातात. टंचाई आराखड्यातील बरीच कामे पूर्ण होतात तर काही कामे अपूर्ण कागदपत्रांमुळे अपूर्ण राहतात. त्यामुळे सुचविण्यात येणार्या कामांसाठी कागदपत्रांची परिपूर्ण पूर्तता होणार का? हे पाहूनच कामे सुचविण्यात यावीत आणि तसे परिपूर्ण प्रस्ताव संबंधितांनी सादर करावेत. तसेच गेली एक-दोन वर्षे काही कामांचा निधी अद्याप आलेला नाही. त्यासाठीही शासनस्तरावर पाठपूरावा होणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. सभापती जाधव यांनीही मार्गदर्शन केले. पणदूर सरपंच दादा साईल, कुंदे सरपंच सचिन कदम, आंदुर्लेचे माजी उपसरपंच संतोष पाटील यांनी पाणी टंचाई प्रश्नांबाबत लक्ष वेधले.
पावशी सरपंच बाळा कोरगांवकर, नेरूर सरपंच शेखर गावडे, मांडकूली सरपंच तुषार सामंत, पाट सरपंच रिती राऊळ, बांव सरपंच नागेश परब, नरेंद्र राणे, रूपेश बिडये आदींसह सरपंच, सदस्य उपस्थित होते. जि.प.सदस्यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली.



























































